वेंगुर्ला /-
तालुक्यातील श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस च्या वतीने श्री शिवाजी हायस्कूल मध्ये ‘मराठी भाषा गौरव दिना’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन तुळस ग्रा.प. सरपंच शंकर घारे यांच्या हस्ते ‘कुसुमाग्रज’ यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मराठी विभाग प्रमुख डॉ.पी.आर.गावडे,उपसरपंच सुशील परब,ग्रा.प.सदस्य जयवंत तुळसकर, तुळस वाचनालयाचे अध्यक्ष सगुण माळकर, जैताराश्रित संस्थेचे उपाध्यक्ष विष्णू परब, कार्यवाह नारायण चव्हाण, प्रा.सचिन परुळकर, सुजाता पडवळ, सर्पमित्र महेश राऊळ, ग्रंथपाल तेजस्वी ठुम्बरे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ.पी.आर.गावडे यांनी आपल्या ओघवत्या भाषेतून मराठीचा इतिहास, तसेच प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून घेण्याचे फायदे, संत साहित्याचा प्रवास, मराठी साहित्याचा जनमानसावर होणारा प्रभाव, संत साहित्याचे आजच्या काळातील महत्व, कुमाग्रजांचे विविध जीवनपैलू आणि त्यांचे साहित्य क्षेत्रातील भरीव योगदान अशा अनेक मुद्यांना स्पर्श करीत आपल्या आई कडून आलेली भाषा ती म्हणजे मातृभाषा हे मुलांच्या मनावर बिंबवत मराठीचे महत्त्व अधोरेखित केले. अनेक उदाहरणे देत ओघवत्या शैलीमध्ये त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अडके मॅडम यांनी, स्वागत सगुण माळकर यांनी केलं. यावेळी शिक्षक – पालक आणि प्रशालेचे विद्यार्थी उपस्थित होते.