दोडामार्ग /-
तालुक्यात काळ्या व जांभ्या दगडाचे उत्खनन राजरोसपणे सुरू आहे. या मधील काही काळ्या दगडाच्या खाणी बेकायदेशीर रित्या सुरू असून महसूल विभागाचे मात्र याकडे दुर्लक्षच दिसत आहे, यातच काल एका काळ्या दगडाच्या खाणीवर जिलेटिनचा स्फोट होऊन दोन परप्रांतीय कामगारांना इजा झाल्याचा संशय असून त्यांना दवाखान्यात न आणता मणेरी येथे रस्त्याच्या कडेला आणून फेकून दिले. हा प्रकार निंदनीय व माणुसकीला काळिमा फासणारा असून ही गोष्ट काळ्या दगडाच्या खाण मालकानेच केल्याचा संशय असून यावर सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी दोडामार्ग भाजपा तर्फे पोलीस निरीक्षक दोडामार्ग व तहसीलदार अरुण खानोलकर यांच्याकडे करण्यात आली.
सदर उपचारासाठी दाखल केलेल्या कामगारांकडून जिलेटिनचा स्फोट हा भेडशी परिसरातील एका क्वारीवर झालेला असून आपल्याला क्वारी मालकाने मणेरी येथे सोडल्याचे ग्रामस्थांना सांगितले. त्यामुळे या कामगारांना ते आपल्याकडे काम करत नाहीत असे भासविण्यासाठी त्यांना मणेरी येथे सोडल्याची शक्यता नाकारता येत नाही सदर ही घटना तालुक्यातील एका काळ्या दगडाच्या खाणीवर घडल्याची चर्चा असून त्या दृष्टीने तपास होणे गरजेचे आहे असेही या निवेदनात म्हटले आहे. परिणामी संबंधित घटना घडली त्या खणीचा खणमालक, त्या खणीसाठी स्फोटके पुरविणारी यंत्रणा, जखमी परप्रांतीय कामगारांचा मुकादम तसेच स्फोट झाल्यानंतर त्या ठिकाणाहून कामगारांना मणेरी येथे फेकून पळ काढणारा संबंधित वाहन चालक याचेवरही गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. सदर प्रकरणाची घटनस्थिती पाहता राजकीय किंवा इतर दबावापोटी घटनेचे गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामुळे योग्य तापासणीअंती वरील सर्वांवर गुन्हे दाखल न केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून भारतीय जनता पार्टी दोडामार्ग यांनी दिला आहे.
तसेच जिलेटीनचा स्फोट हा काळ्या दगडाच्या खाणी वरच झालेला असून प्रशासनावर दबाव आणत घटनास्थळ बदलल्यास गप्प बसणार नाही तसेच जोपर्यंत संबंधित खाण दोषींवर कारवाही होत नाही तो पर्यंत एकही काळ्या दगडाची खाण चालू देणार नाही असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष प्रविण गवस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.