वेंगुर्ले नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न..

वेंगुर्ले नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आज गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ,मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे,नगरसेवक सुहास गवंडळकर,तुषार सापळे,श्रेया मयेकर,साक्षी पेडणेकर, धर्मराज कांबळी,शैलेश गावडे,प्रशांत आपटे,प्रकाश डिचोलकर,पूनम जाधव,कृतिका कुबल,शितल आंगचेकर, स्नेहल खोबरेकर,कृपा गिरप – मोंडकर,संदेश निकम आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
सभेत सुरुवातीस न.प.च्या कंपोस्ट डेपो येथे जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यावरून खडाजंगी चर्चा करण्यात येवून प्रशासनास धारेवर धरण्यात आले.दरम्यान नगरसेवक संदेश निकम हे एका विषयावर बोलण्यास उभे राहिले असता नगराध्यक्ष यांनी त्यांना विरोध केल्याने निकम यांनी ‘सभात्याग’ केला.यावेळी अस्मिता राऊळ – तुषार सापळे- नगराध्यक्ष यांच्यात खडाजंगी झाली. पर्यटन स्थळ येथील
जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यावरून धुराचे साम्राज्य होत असेल तर प्रशासन काय करतेय ? असा प्रश्न शितल आंगचेकर यांनी उपस्थित केला.तसेच तुषार सापळे यांनीही आक्रमक भूमिका मांडली.वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या वरिष्ठ स्तरावरील प्रयत्नातून नातू व्हाळी येथील ८० लक्ष रु.कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
नातू व्हाळी (गाडी अड्डा तिठा ते नगरवाचनालय पर्यंत जाणारी पावसाळी व्हाळी) वरील सांडपाणी/मैलापाणी व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून हा प्रकल्प वेंगुर्ले न.प.ला मिळालेल्या प्रोत्साहन रकमेतून कार्यान्वित करण्यात येणार आहे.बक्षिसाच्या रकमेतून ८० लाख खर्चाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.अशा प्रकारचा वेंगुर्ल्याच्या सांडपाणी समस्येवरील पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित झाल्यास शहराच्या इतर भागातील समस्या सुद्धा अशा प्रकारचे प्रकल्प कार्यान्वित करून सोडवता येऊ शकतो.
शहरातील कॉम्प्लेक्स एसटीपी कार्यान्वित करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, असे दिलीप गिरप यांनी सूचित केले.यावर अस्मिता राऊळ, सुहास गवंडळकर,साक्षी पेडणेकर, प्रकाश डिचोलकर यांनी सविस्तर चर्चा केल्यानंतर नगराध्यक्ष यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत प्रभागनिहाय बैठका घेण्याचे ठरले.साक्षी पेडणेकर यांनी भटवाडी येथील खड्डे व चर बुजविण्यात यावेत अशी सूचना मांडली.श्रेया मयेकर यांनी भुजनाकवाडी व सुंदरभाटले येथील पाईपलाईन संदर्भात मांडलेल्या पत्रानुसार न.प.निधीतून काम करण्यात येणार आहे.प्रशांत आपटे यांनी टपाल मोनिटरिंग सिस्टीम बाबत सूचना मांडली.उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांनी वेंगुर्ले बंदर येथील केबिन टॉयलेट,वोटर एटीएम मशिन्स,आनंदवाडी रस्ता आदी बाबत समस्या मांडल्या. दरम्यान दिलीप गिरप यांनी वोटर एटीएम मेंटेनन्स टीम नेमण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या.तसेच त्वरित पाठपुरावा करण्याचे स्पष्ट आदेश दिलेत.संबंधित दुरुस्तीबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले.दरम्यान वेतन निधी,पावसाळी गटार साफसफाई आदींसह अन्य विषयांवर चर्चा झाली.

अभिप्राय द्या..