विभाग नियंत्रक आणि डिपीओना धरले धारेवर..
कणकवली /-
एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश झाले असतानाही प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. डिपीओ गोसावी हे कर्मचाऱ्यांना वेठीस धरुन त्यांना मानसिक त्रास देत आहेत. डिपीओ यांची भूमिका नेहमीच कामगार विरोधी राहिलेली आहे. शासन कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असुन एसटीचे काही अधिकारी आपली जबाबदारी निट पार पाडत नाहीयेत. यापुढे जर एसटी कर्मचाऱ्यांना अन्यायकारक वागणुक देऊन त्यांची गळचेपी केल्यास शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा सज्जड इशारा शिवसेना युवानेते श्री.संदेश पारकर यांनी सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक श्री.प्रकाश रसाळ यांना दिला.
संदेश पारकर यांनी श्री.रसाळ यांची भेट घेण्यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्या जाणून घेण्यासाठी एसटी कामगार सेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कर्मचारी यांची बैठक कणकवली विजयभवन येथे घेतली. यावेळी प्रत्येक आगारातील कामगारांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली तसेच काही अधिकारी कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे वेठीस धरतात याची माहिती देखील श्री.पारकर यांनी घेतली.
कामगारांवर होत असलेल्या अन्यायाचे गांभीर्य लक्षात घेऊन संदेश पारकर यांनी लागलीच कामगार सेनेच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह थेट विभाग नियंत्रक कार्यालयात धडक देऊन विभाग नियंत्रक यांची भेट घेऊन जाब विचारला. यावेळी डिपीओ कामगारांना देत असलेल्या अन्यायकारक वागणुकीचा पाढाच श्री.पारकर यांनी वाचला. कामगारांच्या समस्यांना मिळत असलेल्या वागणुकीबाबत श्री.पारकर यांनी आक्रमक भूमिका घेऊन विभाग नियंत्रक आणि डिपीओना चांगलेच धारेवर धरले.कामगार सेनेचे कोल्हापूर संपर्कप्रमुख अनुप नाईक, डिव्हिजन सचिव आबा धुरी, अँड.हर्षद गावडे यांनी देखील डिपीओना त्यांच्या दिशाभुल करणाऱ्या उत्तरांविषयी लेखी पुरावे देऊन जाब विचारला.
शासन कर्मचारी हिताचे अनेक निर्णय घेत असताना कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत उदासीन असणारे डिपीओ गोसावी यांच्यासारखे अधिकारी अनावश्यक नियमांचा बडगा उभारुन नेहमीच कर्मचाऱ्यांची अवहेलना करत असतील तर त्या अधिकाऱ्यांचे काय करायचे ते शिवसैनिक बघुन घेतील असा सज्जड ईशारा यावेळी संदेश पारकर यांनी दिला. सर्व विषयांवर वादळी चर्चा झाल्यानंतर विभाग नियंत्रक यांनी प्रलंबित प्रश्नांवर लेखी आश्वासन दिले. यापुढे कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची ग्वाही श्री.रसाळ यांच्याकडून घेतल्या नंतरच संदेश पारकर कार्यालयाच्या बाहेर पडले. एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिल्याबद्दल कामगार सेनेच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संदेश पारकर यांचे आभार मानले.
यावेळी श्री.संदेश पारकर यांच्यासोबत कामगार सेना कोल्हापूर संपर्कप्रमुख अनुप नाईक, सचिव आबा धुरी, अँड.हर्षद गावडे, महिला कामगारसेना संघटक मानसी परब, अजित शेट्ये, राम येडके, गणेश मुळे, रमाकांत जाधव, झुंजार मोरे, अमोल परब, डी.एल.लाड, मिलिंद दळवी, आशिष डीचोलकर, विलास सावंत, श्री.तेली, चंद्रकांत चव्हाण, पि.ए.मनवर, एम.व्हि.लोके, मधुकर भगत, प्रभाकर कामत, सि.पी.गायकवाड, अनिल कुडतरकर आणि कामगारसेना पदाधिकारी आणि कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.