मालवण /-
जिल्हा व्यापारी महासंघाचा ३३ वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा ३१ जानेवारीला सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा मेळावा हा व्हर्च्युअल पद्धतीने घेण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. जिल्ह्यातील सुमारे २५० पदाधिकारी या मेळाव्यात उपस्थित राहणार असून या मेळाव्याचे थेट प्रक्षेपण यु ट्यूब, फेसबुक, स्थानिक वृत्तवाहिन्यांवरून केले जाणार आहे. अशी माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, माजी जिल्हाध्यक्ष नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हॉटेल चैतन्य येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद ओरसकर उपस्थित होते. मेळावा व्हर्च्युअल होत असला तरी तो दिमाखदार, रेकॉर्डब्रेक सहभागाचा असेल. या मेळाव्यात केंद्रीय लघु, मध्यम अवजड, उद्योग परिवहन मंत्री नितीन गडकरी, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, अर्थमंत्री अजित पवार, खासदार सुरेश प्रभू, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, सावंतवाडीचे नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती सहभागी होणार आहेत. मेळाव्यात स्थानिक व्यापार, परप्रांतीयांचे आक्रमण वस्तुस्थिती व उपाय या विषयावर डॉ. गिरीश जखोटीया हे मार्गदर्शन करणार आहेत.
सकाळी अकरा वाजता मेळाव्यास सुरवात होईल. या मेळाव्यात ऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्यासाठी लिंक व्यापारी संघांना, सभासद यांना पाठविली जाणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी डिजिटल स्क्रीनची लावून मेळाव्याचे थेट प्रक्षेपण दाखविले जाणार आहे. मेळाव्याचे राज्यभर प्रसारण केले जाणार आहे. यातून वेगळे वातावरण निर्माण होईल. जिल्ह्यातील सुमारे १० हजाराहून अधिक व्यापारी बांधव या व्हर्च्युअल मेळाव्यात सहभागी होतील. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महासंघाच्यावतीने जीवन गौरव पुरस्कार, महिला उद्योजिका, उत्कृष्ट तालुका व्यापारी संघ, उत्कृष्ट ग्रामीण व्यापारी संघ यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती श्री. तायशेटे, श्री. वाळके यांनी दिली.