सिंधुदुर्गनगरी /-
बेकायदेशीररित्या नोंदणी केलेल्या श्री देव भूजेडोंगरकर सहकारी दूध उत्पादक संस्थेची नोंदणी रद्द व्हावी. तसेच खोटे शिक्के वापरून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत.या मागणीसाठी निगुडे येथील दूध उत्पादक शेतकरी महेश सावंत, संदीप गावडे, वासुदेव गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
सावंतवाडी तालुक्यातील निगुडे येथील दूध उत्पादक शेतकरी महेश सावंत यांनी जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून निगुडे येथील नोंदणी करण्यात आलेली श्री देव भुजेडोंगरकर सहकारी दूध उत्पादक संस्था ही उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररित्या नोंदणी करण्यात आली असल्याचा आरोप महेश सावंत यांनी केला आहे. तसेच श्री देव महामाया सहकारी दूध संस्था पेंडूर, तालुका वेंगुर्ला, केंद्र क्रमांक 2 ही बेकायदेशीर खोटे शिक्के वापरून प्रत्येक शेतकऱ्याचे १०० मिलिलिटर दूध ज्यादा घेऊन शेतकर्यांची आर्थिक फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच बेकायदेशीर रित्या करण्यात आलेली नोंदणी रद्द करावी. अशी मागणी केली आहे. मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा देण्यात आला आहे.