२५ आॕफलाईन शैक्षणिक ॲपची निर्मिती
शाळेची बनविली ब्लॉग वेबसाईट

मसुरे/-

आविष्कार फाऊंडेशन इंडिया ( कोल्हापूर , महाराष्ट्र ) यांचा राज्यस्तरीय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार मूळ देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र तंत्रस्नेही शिक्षक सतिश पांडुरंग मुणगेकर यांना गणपतीपुळे येथे झालेल्या सत्कार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
प्रसिद्ध साहित्यिक,कवी, प्राध्यापक किसनराव कुराडे, बालकवी शाम कुरळे, रत्नागिरी डायटचे अधिव्याख्याता रमेश कोरे, आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष संजयजी पवार यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सतिश मुणगेकर हे गुहागर तालुक्यातील जि.प.पू.प्रा.केंद्रीय शाळा झोंबडी नं.१ येथे
विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य संघटक म्हणून ते काम पाहतात. त्यांनी स्वतःची व शाळेची ब्लॉग वेबसाईट तयार केलेली आहे. २५ आॕफलाईन शैक्षणिक ॲपची निर्मिती केली असून अशी कामगिरी करणारे जिल्ह्यातील ते एकमेव शिक्षक आहेत. शाळेचे सर्व शालेय अभिलेखे (रेकॉर्ड ) डिजिटल स्कूल सॉप्टवेअर मध्ये बनविले असून शैक्षणिक ई – साहित्याची निर्मिती त्यांनी केली आहे. इंटरऍक्टिव्ह कन्टेन्ट निर्मिती, स्मार्ट पीडीएफची निर्मिती, व्हरचूअल क्लासरूमचा वापर, थ्री डी, फोर डी तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर, आभासी प्रयोगशाळेचा अध्यापनात वापर ते करतात. स्वतःचे स्वराली क्रीएशन हे त्यांचे यु ट्युब चॕनेल असून यावर शैक्षणिक अॕनिमेटेड व्हिडिओ, क्राप्ट व्हिडिओ तसेच इतर शैक्षणिक व्हिडिओचा समावेश आहे.
विद्यार्थी व शिक्षक यांचे ओळखपत्र क्यु आर कोड मध्ये तयार केलेले आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ऑनलाईन शिक्षक स्पर्धेत पीपीटी सादरीकरणात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक त्यांनी मिळविला असून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरीच्या आयटी सेल या विभागात त्यांचा सहभाग असतो.
गुहागर तालुक्यातील सर्व शाळांमध्ये तसेच काही गावांमध्ये गुलमोहर, चिंच, बेहडा, इ.५०० रोपांचे मोफत वाटप त्यांनी केले आहे.
शैक्षणिक गट संमेलन, विज्ञान प्रदर्शन तसेच केंद्र , बीट व तालुकास्तरीय क्रीडास्पर्धेत चंदनाची व काळीमिरीची रोपे यांचे मोफत वाटप त्यांनी केले आहे. कार्यक्रमाला कोकण विभागिय अध्यक्ष आबासाहेब पवार, वैभववाडी कोकण उपाध्यक्ष विजय केळकर , सिंधूदुर्ग जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब हरमलकर, रायगड जिल्हाध्यक्ष संदीप नागे तसेच संपूर्ण राज्यातुन आलेले संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. मुणगेकर यांच्या यशा बद्दल अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page