सावंतवाडी/-
केंद्र सरकारने केलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन काळ्या कायद्यामुळे देशभरात शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, दिल्ली च्या सीमेवर विविध राज्यातील शेतकरी गेले ४६ दिवस आंदोलन करत आहेत. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका शिवसेना नेते जयेंद्र परुळेकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. आज जिल्ह्यात त्या तीन कायद्याच्या समर्थनार्थ करण्यात आलेले आंदोलन म्हणजे भाजपचे नाटक असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
कणकवली येथे शेतकऱ्यांच्या विरोधातील कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेली ट्रॅक्टर रॅली म्हणजे भाजपचा ड्रामा असल्याचा घणाघाती आरोप परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. गेल्या ४६ दिवसात दिल्ली सीमेवर ३० शेतकऱ्यांचा बळी गेला असून, याची लाज केंद्र सरकारला वाटली पाहिजे असे ते म्हणाले आहेत. देशातील अनेक ठिकाणी सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या शव पेट्या येत असताना गुजरात मध्ये अशा शव पेट्या का जात नाहीत असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. केंद्र सरकारने जय जवान, जय किसान म्हणण्याऐवजी मर जवान, मर किसान म्हणावे असे देखील ते म्हणाले आहेत. भाजपची दिखाऊ गिरी आता चालणार नसून पब्लिक सब जानती है अशा शैलीत जोरदार टोला लगावला आहे.