बसमधून चांदीची वाहतूक…पोलिसांचा छापा…

बसमधून चांदीची वाहतूक…पोलिसांचा छापा…


राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसमधून चांदीच्या वाहतूक होत असल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. पोलिसांनी तब्बल ३० किलो चांदी जप्त केली असून एका व्यक्तीची चौकशी सुरू आहे.
पुणे मध्यवर्ती बसस्थानक येथून शुक्रवारी सायंकाळी सात वाजता शिवशाही बस (क्र. एम.एच.०९/ ई.एम.१२९३) नागपूरकडे निघाली. बसचे चालक व वाहक मुकेश हुकरे, मोहन पडोळे दोन्ही रा. नागपूर, उमेश बावनकर रा. अमरावती व प्रशांत मकेश्वर रा. नागपूर हे होते. बसमध्ये पुणे येथून एक व्यक्ती नागपूरला निघाला होता. त्याने दोन बॉक्स व एक सुटकेस बसमध्ये लगेज स्वरूपात ठेवली. परंतु सदर व्यक्ती अकोला येथे उतरला व त्याच्याऐवजी आणखी एक व्यक्ती बसमध्ये बसला. परंतु लगेज उतरविण्यात आले नाही. शनिवारी दुपारी अकरा वाजताचे सुमारास बस अमरावती येथे पोहोचल्यावर अकोला येथून बसलेली व्यक्ती उतरली. त्याने बसमधील लगेज अमरावती येथून बसलेल्या व्यक्तीच्या स्वाधीन करीत असल्याचे सांगितले. यावेळी चालक व वाहक यांना संशय आला. त्यांनी बसमध्ये नव्याने बसलेल्या प्रवाशास लगेजबाबत विचारणा केली. त्याने इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असल्याचे सांगितले. चालक व वाहकांनी एक बॉक्स उघडण्यास सांगितले. त्यात चांदीचे दागिने आढळून आले. यानंतर चालकाने बस फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात नेली. ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. तर प्रवाशांना दुसऱ्या बसने नागपूरला पोहचविण्यात आले. पोलिसांनी चांदीचे अलंकार असलेला बॉक्स, सुटकेस व आणखी एक बॉक्स जप्त केला. सदर व्यक्तीने कुरियर कंपनीसाठी काम करीत असल्याचे सांगितले. कुरियर कंपनी सुवर्णकारांचा माल पोहोचविण्याचे काम करीत असून जीएसटीसह सर्वच देयकांच्या पावत्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..