बॅ. खर्डेकर स्मृति वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त दिव्यता मसुरकर व कस्तुरी शेटये यांना मेमोरियल शिल्ड व पारितोषिक देऊन सन्मान

वेंगुर्ला /-

परदेशात शिक्षण घेण्यासाठी गेले असतानाही बॅ.खर्डेकर हे तेथे न थांबता मातृभूमीची सेवा करण्यासाठी भारतात परत आले आणि त्यांनी शिक्षण कार्यास वाहून घेतले. वेंगुर्ल्यात हे महाविद्यालय स्थापन झाल्यानेच आज शैक्षणिक क्षेत्रात प्रगती घडून आली आहे.त्यामुळे बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी केलेले कार्य पाहता त्यांचे गुण आत्मसात करा,असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठ भूगोल अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा.डॉ.शिवराम ठाकूर यांनी वेंगुर्ले येथे केले.
वेंगुर्ला येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात संस्थापक व प्रथम प्राचार्य बॅ.बाळासाहेब खर्डेकर यांचा ५७ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा.शिवराम ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी व्यासपिठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, कलावलयचे अध्यक्ष सुरेंद्र खामकर, रोटरी इंटरनॅशनलचे पॉल हॅरिस फेलो संजय पुनाळेकर, बॅ.खर्डेकर स्मृतिदिन कार्यक्रमाचे चेअरमन प्रा.प्रदिप होडावडेकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक पी.एन.शिदे आदी उपस्थित होते.बॅ.खर्डेकर हे परमेश्वराने तयार केलेली एक कलाकृती होती. त्यांचे अचूक लक्ष टिपणे, ध्येय साध्य करणे तसेच दानशूरपणा हे गुण विद्यार्थ्यांनी अंगिकारावेत,असे आवाहन प्राचार्य देऊलकर यांनी केले. या कार्यक्रमात इंग्लिशमधून घेण्यात आलेल्या बॅ.बाळासाहेब खर्डेकर स्मृति वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त दिव्यता मसुरकर व कस्तुरी शेटये (टी.वाय.बी.कॉम.) यांना मेमोरियल शिल्ड व पारितोषिक देऊन तर द्वितीय क्रमांक राजश्री परब (११वी), तृतीय क्रमांक संतोषी आमडोसकर (टी.वाय.बी.एस्सी.) उत्तेजनार्थ प्राची मुळीक (एफ.वाय.बी.एस्सी) व वैष्णवी घारे (११वी विज्ञान) यांनाही पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. एन.सी.सीचे ऑफिसर डॉ.बी.जी.गायकवाड यांनी तीन महिन्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करुन ‘लेफ्टनंट‘ हा किताब मिळविल्याबद्दल त्यांचा तर प्रमुख पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.डॉ.व्ही.एम.पाटोळे, प्रा.डी.आर.आरोलकर, डॉ.सुनिल भिसे, प्रा.डी.एस.पाटील, प्रा.एम.डी.बुजारे, कु.कस्तुरी शेटये यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सुरेंद्र चव्हाण, माजी कर्मचारी अरविद आळवे, माजी विद्यार्थी प्रा. नरेश शेटये यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विवेक चव्हाण यांनी तर आभार प्रा.संपदा दिक्षित यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page