दीरानेच दिली सुपारी; मटका क्वीन’ जया भगतच्या हत्येचा कट …

दीरानेच दिली सुपारी; मटका क्वीन’ जया भगतच्या हत्येचा कट …

मुंबई: मयत मटका किंग सुरेश भगत याची पत्नी जया भगत हिच्या हत्येचा कट उघड झाला आहे. जया हिचा दीर आणि सुरेश भगत याचा भाऊ विनोद भगत यानेच तिच्या हत्येची सुपारी दिल्याचं उघड झालं असून या प्रकरणी विनोदसह पाचजणांना मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-9 ने अटक केली आहे.

सुरेश भगत हे मटका किंग म्हणून ओळखला जात होता. त्याची 2008 सालात हत्या करण्यात आली. एका मोठ्या अपघातात सुरेश भगत याचा मृत्यू झाला होता. मात्र, तपासात हा अपघात नसून हत्या असल्याचं उघडकिस आलं होतं. सुरेश याच्या हत्येबद्दल त्याची पत्नी जयासह काही जणांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी जयाला शिक्षाही झाली होती. त्यानंतर शिक्षा भोगून जया तुरुंगाबाहेर आली होती. तेव्हापासून ती घाटकोपर येथे राहते. क्राईम ब्रांचच्या युनिट नऊचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांना काही महत्वाची खबर मिळाली. या माहितीच्या आधारावर गोपाळे यांनी खार परिसरातून मोहम्मद अन्सारी नावाच्या संशयिताला ताब्यात घेतलं होत. त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडे फोन, गावठी कट्टे सापडले होते. त्यानंतर मोहमद दर्जी याला अटक करण्यात आली होती. तसेच उत्तर प्रदेशातील बिजनोर येथून रामवीर शर्मा आणि मकसुद कुरेशी या चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत विनोद भगत याच नाव आल्यावर त्यालाही अटक करण्यात आली, अशी माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे ज्वॉइंट सीपी मिलिंद भारंबे यांनी दिली.

भगत कुटुंबात मटक्याच्या व्यवसायावरून वाद आहेत. प्रत्येकाला मटक्याच्या हा व्यवसाय स्वतःच्या ताब्यात हवा आहे. सुरुवातीला सुरेश भगत हा सर्व व्यवसाय पाहात होता. मात्र, त्याची पत्नी जया भगत हिला या व्यवसायावर कब्जा मिळवायचा होता. यामुळे तिने त्याची हत्या केली. तर विनोद भगत यालाही या व्यवसायाचा ताबा हवा असल्याने त्याने आता जयाची सुपारी दिल्याचं उघडकीस आलं आहे. जया सोबत तिच्या बहिणीची हत्या करण्याची सुपारीही देण्यात आली होती. प्रत्येकीच्या हत्येसाठी तीस लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

अभिप्राय द्या..