भारतीय जनता पार्टीचा एस्. टी.प्रशासनाला इशारा
वेंगुर्ला/
बेस्ट प्रशासनाच्या सोयीकरीता एस्. टी.प्रशासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहक चालक पाठविले.त्यामुळे ग्रामीण प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे .अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने एस्. टी.चे वेळापत्रक कोलमडून गेले आहे.ह्याचा जाब विचारण्यासाठी भाजपा वेंगुर्ले च्या वतीने आगार व्यवस्थापक यांना आज घेराव घालण्यात आला.
तसेच ३१ डिसेंबर नंतर वेंगुर्ले आगारातील एकही वाहक – चालक मुंबईला पाठविला तर वेंगुर्ले आगार बंद करु असा इशारा एस्. टी. प्रशासनाला भाजपा च्या वतीने देण्यात आला.यावेळी चालक- वाहक यांच्या कोरोना चाचणीबाबत जाब विचारण्यात आला.मुंबईतुन सेवा बजाऊन आलेले चालक वाहक यांची ताबडतोब कोरोना चाचणी न करता सुट्टीचे कारण सांगून त्यांची दुसऱ्या दिवशी चाचणी केल्याबद्दल आगार व्यवस्थापकांना धारेवर धरण्यात आले.तसेच ह्या पैकी कोणी कोरोना बाधीत आल्यास त्याची पुर्ण जबाबदारी एस्.टी.प्रशासनावर राहील असा इशारा देण्यात आला.
मुंबईतुन सेवा बजाऊन आलेले चालक वाहक यांचा कोरोना तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झाला नसताना काही कर्मचाऱ्यांना ड्युटी वर पाठविण्यात आले .याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले.तसेच अशामुळे जर कोरोना विषाणुचा फैलाव झाल्यास त्याला एस्. टी.प्रशासन जबाबदार असण्याचे सांगितले.
यावेळी शाळा व काॅलेज सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीकरीता असलेल्या एस्. टी.च्या फेऱ्या ताबडतोब सुरु कराव्या, अशी मागणी करण्यात आली.यावेळी आगार व्यवस्थापक यांनी निवेदनाची दखल घेऊन विभाग नियंत्रक यांच्याबरोबर याबाबत चर्चा करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
यावेळी भाजपाच्या आंदोलनात भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, एस्. टी.कामगार नेते प्रकाश रेगे, शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर,किसान मोर्चा चे बाळु प्रभु, तुळस सरपंच शंकर घारे, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, ता.चिटनीस समीर चिंदरकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर, बुथप्रमुख – प्रकाश मोटे,शेखर काणेकर,विनय गोरे,युवा मोर्चा चे सोमकांत सावंत,सुजय गावकर आदींसह एस्. टी.चे चालक – वाहक उपस्थित होते.