मुंबई /-
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर हे प्रकरण गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. तसंच आताही दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदार संजय राऊत यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. तसंच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि राऊत यांच्यावर निशाणाही साधला.
“संजय राऊत यांनी राज्याच्या ठेका घेतला आहे का? त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. ते सतत महिलांचा अपमान करत आहेत. त्यांनी आपली मर्यादा साभाळावी,” असं राणा यावेळी म्हणाल्या. “कुठे ना कुठे मुख्यमंत्र्यांचं राऊतांना समर्थन आहे असं वाटत आहे. जर मुख्यमंत्र्यांचं राऊत यांना समर्थन असेल तर मुख्यमंत्री बाहेर येऊन त्यांचं समर्थन करतील आणि जर त्यांचा राऊत यांना विरोध असेल तर त्यांनी राऊत यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा घ्यावा,” असं त्या म्हणाल्या.