बांदा /-
बांदा-दोडामार्ग या २६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुर्दशा झाली असून प्रशासनाचे व सार्वजनिक बांधकाम खात्याचे वेळोवेळी लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक २१ रोजी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बांदा सरपंच अक्रम खान, उपसभापती शीतल राऊळ यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत यावेळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, डेगवे ग्रामस्थ तात्या स्वार आदी उपस्थित होते. खान म्हणाले की, या रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आपण स्वतः गतवर्षी स्वातंत्रदिनी उपोषण केले होते. त्यावेळी तातडीने काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र एसआर (स्पेशल रिपेअर) मधून केवळ ४०० मीटर रस्त्याचे काम करण्यात आले. त्यानंतर तब्बल एक वर्ष या रस्त्याची दुरुस्ती न केल्याने हा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे धोकादायक बनला आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता युवराज देसाई यांना वेळोवेळी घेराव घालून या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत जाब विचारण्यात आला आहे. मात्र दुर्लक्ष होत असल्याने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रस्त्यावर अपघातात कोणी जायबंदी झाला तर त्याची पूर्णपणे जबाबदारी ही संबंधित विभागाची राहील असा निर्वाणीचा इशारा शीतल राऊळ यांनी दिला.
या आंदोलनात जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नाथा नाडकर्णी, संजू विरनोडकर, बांदा ते दोडामार्ग रस्त्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत.