सुमारे दिड लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज

ग्रामस्थांच्या तत्परतेने आग आटोक्यात आणण्यात यश

आचरा

चिंदर सडेवाडी येथील जत्रेच्या वडानजिक असलेल्या सागर उत्तम गोलतकर यांच्या धरत्या कलम बागेस शुक्रवारी दुपारी विद्युत स्पार्किंगमुळे लागलेल्या आगीत सुमारे शंभर हापुस कलमे आणि पन्नासहून अधिक काजू कलमे जळून सुमारे दिड लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.ग्रामस्थांनी तातडीने धावाधाव करत आग आटोक्यात आणल्याने लगतच्या बागायतदारांचे मोठे नुकसान टळले.

जत्रेच्या वडानजिक गोलतकर यांच्या बागेत तीस वर्षांची शंभर धरती हापूस कलमे तसेच पन्नास काजू कलमे आहेत.याच बागेतून ११केव्ही व्होल्टेजची विद्युत वाहिनी गेली आहे.येथील ग्रामस्थांच्या मते विद्युत स्पार्किंगमुळे दर वर्षी या भागात आग लागून नुकसान होत आहे.या साठी बागेतील सदर विद्युत खांब हटवून बागेबाहेर उभा करण्याची मागणी बागमालकांकडून केली जात आहे.मात्र विद्युत मंडळाकडून या बाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सागर गोलतकर यांच्या बागेला शाॅर्ट सर्किटमुळे आग लागली. या बाबतची खबर माउली रिसॉर्टचे मालक विशाल गोलतकर यांनी ग्रामस्थांना सांगताच
बाबू हडकर,देवू हडकर,सतिश गोलतकर , सिद्धेश गोलतकर, भालचंद्र गोलतकर, खोत यांसह अन्य ग्रामस्थांनी धाव घेत सागर गोलतकर यांना बागेतील आग विझविण्यासाठी मदत केली.यात गोलतकर यांच्या बागेतील हापूस,व काजू कलमांसहीत झाडांना पाणी देण्याचा पाईप ही जळून नुकसान झाले.
या भागात दर वर्षी शाॅर्ट सर्किट मुळे आग लागत असून या बाबत विद्युत मंडळाला वारंवार कल्पना देऊनही कोणती कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या बाबत तातडीने बागांमधील विद्युत पोल हटविण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page