चालकाला किरकोळ दुखापत : मोठा अनर्थ टळला

वेंगुर्ला –
ब्रेक फेल झाल्याने रेडी हुडा येथील अवजड वळणार आज सायंकाळी डंपर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये चालकाला किरकोळ दुखापत झाली. मात्र त्या ठिकाणी पादचारी व अन्य गाड्या नसल्याने मोठा अनर्थ टळला.
रेडी येथील संजू नागोळकर यांचा एम.एच.०७ सी.६८३६ या क्रमांकाचा डंपर घेऊन आरोंदा येथून रेडी येथे येत होता. हुडा येथील आरोंदा तिठ्यावरील उतार व अवजड वळणावर डंपर आला असता चालकाला गाडीचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात आले. मात्र त्याच्याकडे अन्य कोणताच पर्याय नव्हता. अखेर वळण घेताना डंपर पलटी झाला. या अपघातात डंपरचे थोडे नुकसान झाले असून चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थ व सरपंच घटनास्थळी दाखल झाले. मात्र अपघात स्थळी त्या वेळी समोर अन्य गाड्या आणि पादचारी उभे नसल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान सदर ठिकाणी गतिरोधक बसवावेत अशी मागणी आम्ही ग्रामस्थांच्या वतीने अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. मात्र ते याकडे दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप जि. प.सदस्य प्रितेश राऊळ यांनी केला आहे. या अपघात नंतर तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page