मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनमानी कारभार करत आहेत……..

मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनमानी कारभार करत आहेत……..

उपनगराध्यक्ष राजन वराडकर व भाजप गटनेते गणेश कुशे यांचा गंभीर आरोप ……
मालवण /

मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर हे नगरपालिकेचे मालक असल्याच्या अविर्भावात कारभार करत आहेत. मनमानी करून चुकीच्या पद्धतीने व शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून जावडेकर हे कामे करीत असल्याचा गंभीर आरोप मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर व मालवण नगरपालिकेतील भाजप गटनेते गणेश कुशे यांनी करत जावडेकर यांच्या विरोधात थेट कोकण आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. जावडेकर यांच्या मनमानी कारभाराची व गैरव्यवहारांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणीही वराडकर व कुशे यांनी कोकण आयुक्तांकडे केली आहे.

याबाबतचे निवेदन उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते नगरसेवक गणेश कुशे यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे सादर करत मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या कारभाराबाबत माहिती दिली आहे. यामध्ये मालवण शहर विकास योजना आरक्षण क्र. २४ मधील भाजी मार्केट शॉपिंग सेंटर मधील गाळा क्र. १ (१) मध्ये चुकीच्या पद्धतीने पोट भाडेकरू ठेवण्यास मुख्याधिकारी जावडेकर यांनी परवानगी दिल्याचा आरोप वराडकर व कुशे यांनी केला आहे. भाजी मार्केट इमारतीचे गतवर्षी स्ट्रक्चरल ऑडिट होऊन इमारत धोकादायक असून ती पाडावी आणि नवीन बांधावी असा अहवाल आल्यावर मुख्याधिकारी जावडेकर यांनी सर्व गाळे धारकांना नोटिसा काढून गाळे खाली करण्यास भाग पाडले. मात्र गाळा क्रमांक १ (१) मध्ये हॉटेल व्यवसायासाठी परवानगी देऊन त्यापुढे त्या गाळ्यात पोट भाडेकरू ठेवण्यास जावडेकर यांनी परवानगी दिल्यावर तेथे हॉटेल ऐवजी बिअर शॉपी सुरू करण्यात आली. अशा प्रकारचा बदल करण्यास नियमाप्रमाणे कौन्सिलची मान्यता घेणे आवश्यक असताना जावडेकर यांनी स्वतःच्या अधिकारात पोट भाडेकरू ठेवण्यास व हॉटेल ऐवजी बिअर शॉपी सुरू करण्यास परवानगी दिली. कौन्सिलच्या मान्यतेशिवाय बदल केल्यास करार रद्द होणारा आहे. याकडे मुख्याधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केला असून ही गंभीर व शासनाच्या नियमांचा भंग करणारी बाब आहे, असे वराडकर, कुशे यांनी म्हटले आहे.

एका महिलेस तिच्या मागणीप्रमाणे स्वतंत्र वीज मीटर घेण्याकरिता त्यांच्या सामाईक घराची फोड करून घर नंबर देण्यात आला याचा उपयोग करून त्या महिलेने वीज मीटरही घेतला. याच आधारावर अन्य एका महिलेने मुख्याधिकाऱ्यांकडे अशाप्रकारे वीज मीटर घेण्यासाठी विनंती केली. मात्र तिला अशा प्रकारे वीज मीटर देता येणार नाही असे उत्तर मुख्याधिकारी जावडेकर यांनी दिले. याबाबत आम्ही नगरसेवकांनी पहिल्या महिलेने सादर केलेली कागदपत्रे व मुख्याधिकाऱ्यांचा आदेश याबाबत माहिती मागितली असता जावडेकर यांनी ती देण्यास टाळाटाळ केली. नगरसेवकांना अशी वागणूक देणारे मुख्याधिकारी सामान्य नागरिकांना काय न्याय देणार असा प्रश्न वराडकर व कुशे यांनी उपस्थित केला आहे.

मालवण नगरपालिके मार्फत कृ.सि. देसाई शिक्षण मंडळाने दिलेल्या जागेत उभारण्यात येणाऱ्या स्विमिंग पूल आणि ट्रेनिंग सेंटरच्या कामाबाबतची महत्त्वाची कागदपत्रे जावडेकर यांनी गायब केल्याचा गंभीर आरोप राजन वराडकर व गणेश कुशे यांनी केला आहे. हे काम पूर्ण करण्यास देण्यात आलेली दोन वर्षाची मुदत संपूनही काम पूर्ण न झाल्याने या कामासाठी नव्याने परवानगी घेण्याबाबत या मंडळाला कळविले होते. याबाबत मंडळाने नगरपालिकेला पत्र पाठविलेले असताना ते आमच्याकडे आलेलेच नाही असे उत्तर नगरपालिकेच्या संबंधित विभागाकडून देण्यात आले. पत्र पाठवून पाच महिने उलटूनही ते संबंधित विभागाकडे पोहोचत नाहीत आणि त्याच कालावधीत संबंधित ठेकेदाराची बिलेही काढली जातात त्यावर सुमारे साडे नऊ लाख रुपये खर्च केले जातात्या सर्व बाबी शासनाच्या आदेशाचा भंग करणाऱ्या आहेत असे, वराडकर व कुशे यांनी म्हटले आहे.

तसेच नगरपालिकेने एक वर्षापूर्वी खरेदी केलेले नवीन सक्शन वाहन नादुरुस्त होऊन पाच महिने लोटले असून त्यावर दुरुस्तीपोटी झालेल्या खर्चाची रक्कम ठेकेदाराने नगरपालिकेकडून मागणी केली आहे. मात्र ती रक्कम देण्यास मुख्याधिकारी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे ते वाहन ठेकेदाराच्या ताब्यात असून यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच जुने अग्निशमन वाहन निष्कासीत होऊन एक वर्ष लोटले तरी मालवणात नवीन अग्निशमन वाहन येऊ शकले नाही याबाबत मुख्याधिकारी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या सर्व प्रकारांची सखोल चौकशी करून मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी चालविलेल्या मनमानी काराभारा बाबत व गैरव्यवहारा बाबत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी वराडकर व कुशे यांनी कोकण आयुक्तांकडे केली आहे.

अभिप्राय द्या..