नवी दिल्ली: दिल्ली-हरयाणा सीमेवरील आंदोलनात सहभागी असलेले संत बाबा राम सिंह यांनी आज बुधवारी स्वत:ला गोळी मारून आत्महत्या केली. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बाबा राम सिंह हे करनाल येथील रहिवासी होते. त्यांची आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी देखील सापडली. यात बाबा राम सिंह यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला आहे. बाबा राम सिंह यांचे सेवक गुरमीत सिंह यांनी देखील या घटनेला दुजोरा दिला आहे. बाबा राम सिंह यांचे हरयाणा आणि पंजाबमध्येच नाही, र जगभरात लाखो अनुयायी आहेत.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचा मराठी अनुवाद
आपल्या हक्कासाठी शेतकऱ्यांचे दु:ख मी पाहिले आहे
त्यांना रस्त्यावर पाहून मला दु:ख झाले आहे
सरकार त्यांना न्याय देत नाही
हा एक गुन्हा आहे
जो गुन्हा करतो तो पापी आहे
अन्याय सहन करणे हे देखील पाप आहे
कोणी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, तर कोणी अन्यायाविरोधात काही केले आहे
कोणी पुरस्कार परत करून आपला राग व्यक्त केला आहे
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी , सरकारी अन्यायाविरोधातील क्रोध येऊन सेवक आत्महत्या करत आहे
हा अन्यायाविरोधात आवाज आहे
हा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज आहे
‘वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह’
मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता शेतकऱ्याचा मृत्यू
या पूर्वी, कुंडली सीमेवर केंद्राच्या तीन नव्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात एका शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील भिंडर कला या गावचे रहिवासी असलेले मक्खन खान (४२) आपले सहकारी बलकार आणि इतरांसह तीन दिवसांपूर्वी कुंडली सीमेवर शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.