नांदेड : काही वर्षांपूर्वी सलमान खानचा बजरंगी भाईजान नावाचा एक सिनेमा सुपरहिट ठरला होता. पाकिस्तान मधली एक मूकबधिर चिमुकली भारतात हरवली होती, तिला पाकिस्तानात नेऊन तिच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करताना या चित्रपटाच्या साध्या भोळ्या नायकाची भूमिका सर्वांनाच आवडली होती. अगदी असेच काहीसे कथानक नांदेडमध्ये प्रत्यक्षात उतरलं आहे. यात फरक फक्त इतका आहे की, प्रत्यक्षात घडलेल्या या घटनेतील मुलगी भारतातील असून पाकिस्तानात हरवली होती. मूळची नांदेड परिसरातील असलेल्या या मुलीच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी आता प्रयत्न सुरु झाले आहेत.
नांदेड रेल्वे स्थानकावर सापडलेली 25 वर्षीय गीता मूकबधिर आहे. ती पाच वर्षांची असताना चुकून रेल्वेने पाकिस्तानात पोहोचली. हरवलेल्या गीताबाबत माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना माहिती मिळताच स्वर्गीय स्वराज यांनी गीताला 2015 मध्ये भारतात आणले. तेव्हापासून गीताच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी सरकार आणि स्वयंसेवी संस्था प्रयत्नशील आहेत.

 

भलेही गीता ऐकू-बोलू शकत नसली तरी सांकेतिक भाषेतून आपल्याबाबत माहिती देते. गीताच्या म्हणण्यानुसार, तिच्या मूळ गावाजवळ ऊस, तांदूळ आणि भुईमुंग अशी पिके घेतली जातात. तर गीताला तेलगू सिनेसृष्टीतील नायक महेशबाबू फार आवडतो. यावरुन गीताची काळजी घेण्याची जबाबदारी असणारे इंदुरच्या आनंद सोसायटीने अंदाज बांधून तिला नांदेडला आणले आहे.

गीताच्या माहितीवरुन इंदुरचे पथक तिला घेऊन नांदेडमध्ये दाखल झालेय. एका अंदाजानुसार, तेलंगणा सीमेच्या आसपास तिचे कुटुंब असण्याची शक्यता आहे. त्यानुसार, तिच्या कुटुंबाचा शोध घेण्यात येतो आहे. या कामी स्थानिक पोलीस आणि मूकबधिर संघटनांची मदत घेण्यात येणार आहे.

पडद्यावर भूमिका साकारत असाच विषय सलमान खानने गाजवून सोडला होता. त्यातील सुखांतामुळे तो चित्रपट लोकांच्या स्मरणात राहिला. मात्र, प्रत्यक्षात अशाच पद्धतीच्या घटनाक्रमात गीताच्या कुटुंबाचा शोध अद्याप सुरु आहे. तिला तिचे कुटुंब मिळाले तर खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात घडलेल्या या घटनेतील नायक असलेल्या स्वर्गीय सुषमा स्वराज यांना खरी आदरांजली वाहिल्या सारख होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page