भारतातील पहिले हिंदकेसरी श्रीपती शंकर खंचनाळे यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. कोल्हापुरातील रुग्णालयात सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कोल्हापूर: एकेकाळी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गौरविलेले आणि थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर चमलेले देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती शंकर खंचनाळे यांचे सोमवारी सकाळी साडे आठ वाजता वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. अनेक दिग्ग्जांना आस्मान दाखवणाऱ्या या मल्लाच्या निधनामुळे कोल्हापूरची लाल माती देखील अश्रूनी न्हावून निघाली आहे.

खंचनाळे गेले काही दिवस आजारी होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी येथील एका सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. वृध्दापकाळ आणि कंबरदुखी व इतर काही व्याधीमुळे त्यांची प्रकृती अनेक दिवसापासून चिंताजनक बनली होती. काही दिवस डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. मात्र अखेर पंधरा दिवसाच्या उपचारानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांच्या पश्चात पत्नी शांता, मुले सत्यजित, रोहित आणि विवाहित मुलगी पौर्णिमा, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

खंचनाळे हे मुळचे कर्नाटक राज्यातील. बेळगाव जिल्ह्यातील एकसंबा हे त्यांचे गाव. त्यांचे वडिल पैलवान होते. आपल्या पाठोपाठ मुलगाही लाल मातीत कुस्तीचे धडे गिरवत नाव कमवावे असे त्यांना वाटत होते.त्यानुसार त्यांनी खंचनाळे यांना कोल्हापूरला पाठविले. कोल्हापुरातील शाहूपुरी तालमीत सराव करत त्यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील नामांकित मल्ल म्हणून परिचीत झालेले खंचनाळे नंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले. या काळात त्यांनी देशातील अनेक मल्लांना चितपट केले. ज्यामुळे त्यांचा अनेक पुरस्काराने गौरव झाला.
नवी दिल्ली येथे ३ मे १९५९ ला झालेल्या लढतीत प्रतिस्पर्धी प्रसिद्ध मल्ल रुस्तम-ए-पंजाब बत्तासिंग याला आस्मान दाखवत ते हिंदकेसरी झाले. कोल्हापूरचा पहिला मल्ल हिंदकेसरी झाला आणि खंचनाळे तेव्हापासून कोल्हापूरकरांच्या गळ्यातील ताईत बनले. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देखील त्यांचे तोंडभरून कौतुक केले. हिंदकेसरी झाल्यानंतर त्यांनी कराड येथे झालेल्या लढतीत अनंत शिरगांवकर यांना हरवून ते ‘महाराष्ट्र केसरी’ झाले. महाराष्ट्र सरकारने शिवछत्रपती पुरस्कार, तर कर्नाटक सरकारने ‘कर्नाटक भूषण’ पुरस्कार देत त्यांच्या कुस्ती कलेचा सन्मान केला होता. शेवटच्या क्षणापर्यंत कुस्तीची नाळ कायम ठेवताना त्यांनी अनेक मल्ल घडवले. ते राष्ट्रीय तालीम संघाचे पाच वर्षे अध्यक्ष होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page