सोमवारपासून मुंबई मेट्रोचे नवे वेळापत्रक, अशा आहेत वेळा

सोमवारपासून मुंबई मेट्रोचे नवे वेळापत्रक, अशा आहेत वेळा

मुंबईतील प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रो वनने सोमवार १४ डिसेंबरपासून मेट्रो सेवेच्या वेळांमध्ये वाढ करण्याची माहिती जाहीर केली आहे. ग्राहकांच्या चांगल्या प्रतिसादामुळेच मेट्रोने या वेळा वाढवण्याचे निश्चित केले आहे. ऑपरेटींगच्या वेळा वाढणार असल्याने ग्राहकांच्या सुविधेत भर पडले असे मेट्रो प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मेट्रोच्या वर्सोवा स्टेशन येथून पहिली ट्रेन सराळी ७.५० वाजता सुटेल, तर घाटकोपर येथून ८.१५ वाजता पहिली ट्रेन सुटेल. तर वर्सोव्यातून शेवटची ट्रेन ८.५० वाजता सुटेल तर घाटकोपर येथून शेवटची ट्रेन ९.१५ वाजता सुटेल असे मुंबई मेट्रोने स्पष्ट केले आहे.

अनलॉक प्रक्रियेनंतर मेट्रोच्या सेवा मुंबईत सुरू झाल्या. सकाळी ८.३० वाजल्यापासून ते रात्री ८.३० वाजेपर्यंत ही ट्रेनची सेवा सुरू होती. मेट्रोने लोकलसाठीचे वेळापत्रक जरी जाहीर केले असले तरीही स्टेशनमध्ये १५ मिनिटे आधी प्रवेश करता येणार आहे. घाटकोपर अंधेरी वर्सोवा दरम्यान मुंबई मेट्रोच्या फेऱ्या सुरू झाल्यानंतर सध्या ५० हजार प्रवासी मेट्रो सेवेचा दररोज वापर करत आहे. या प्रवाशांना डिजिटल तिकिट, स्मार्ट कार्ड आणि क्यूआर टिकिट देण्यात येतात. प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रोने पाच फुट उंच असे क्यूआर कोडचे बोर्ड प्रत्येक स्टेशनबाहेर बसवले आहेत. सध्या मेट्रोची सेवा ही सर्वांसाठी आणि सर्व वयोगटासाठी खुली आहे. पण त्याचवेळी कोरोनाचा प्रसार होणार नाही याची काळजी मेट्रो प्रशासनाने घेतली असल्याचा मेट्रो वनचा दावा आहे.

महाराष्ट्र सरकारने १५ ऑक्टोबरपासून मेट्रोची सेवा सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वर्सोवा – अंधेरी – घाटकोपर दरम्यान मेट्रोची सेवा १९ ऑक्टोबरपासून सुरू झाली. कोरोनात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे जवळपास ७ महिने ही सेवा बंद होती. आता अतिरिक्त वेळातील फेऱ्यांमुळे मुंबईकरांना वाहतूकीचा आणखी पर्याय उपलब्ध होईल असे मेट्रो वनकडून सांगण्यात आल.

अभिप्राय द्या..