आचरा /-
निसर्गात असलेले अनेक चमत्कार मनुष्याला अचंबित करतात आणि मोहूनही टाकतात.असाच एक चमत्कार गेले काही दिवस सिंधुदुर्ग समुद्रात अनुभवला जात आहे. शनिवारी सायंकाळी आचरा समुद्रातही तो अनुभवता आला.चक्क निळ्या रंगाच्या लाटांनी समुद्र उजळून निघाला आणि समुद्र किनारी पर्यटनाला आलेल्या पर्यटकांना सुखद धक्का देऊन गेली.हा नजारा बघण्यासाठी आचरा समुद्र किनारी पर्यटकांची गर्दी उसळली होती.
थंडीच्या दिवसात गेल्या काही वर्षांपासून हा अनुभव येवू लागल्याचे किनारपट्टी भागातील ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. एका विशिष्ट प्रकारच्या जीवांमुळे या लाटा उजळत असल्याचे जाणकार सांगतात.हे जीव प्लवंग आहेत.त्यांचे शास्त्रीय नाव नाॅकटील्युका असे आहे. समुद्राच्या पाण्याबरोबर हे सुक्ष्म प्लवंग जेव्हा किनारयावर येतात आणि ते जेव्हा एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येतात तेव्हा ते प्रकाशमान होतात आणि संपूर्ण लाट प्रकाशमान होते.यामुळे समुद्री खाडी पात्रात कालवे, तसरे, मुळे,घुघरे आदी शिंपले मोठ्या प्रमाणात तयार होतात असे आचरा येथील जाणकार मच्छीमारांचे म्हणने आहे.समुद्र किनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना,निसर्गाची ही वेगळी अनुभूती सुखद धक्का देऊन गेली.ही अनुभूती घेण्यासाठी शनिवारी सायंकाळी आचरा समुद्र किनारी पर्यटकांची गर्दी वाढली होती.