सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश

सरकारी कर्मचाऱ्यांनाही आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश राज्य सरकारने जाहीर केले आहेत. कार्यालयात कामकाज करणारे बरेचसे आधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थीत असताना शासकीय कर्मचाऱ्यांना अनुरुप ठरेल अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होते.

सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून एका चांगल्या प्रतीच्या वागणुकीची तसेच व्यक्तीमत्वाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येते. अशा परिस्थितीत जर आधिकारी व कर्मचारी यांची वेशभूषा ही अशोभनीय, गबाळी तसेच अस्वच्छ असेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्याच्या एकंदरीत कामकाजावरही होतो. या सर्व बाबी विचारात घेता मंत्रायलय तसेच सर्व राज्य सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा याबाबत पुढील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत…

१) गडद रंगांचे चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान करू नयेत. तसेच सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीन्स टी-शर्टचा वापर कार्यालयामध्ये करू नये.

२) खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा (शुक्रवारी) खादी कपड्याचा पेहराव परिधान करावा.

३) महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा तसेच पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बूट (शूज), सॅन्डल याचा वापर करावा.

४) कार्यालयामध्ये स्लिपरचा वापर करू नये

५) सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा. जसे महिला कर्मचार्यांनी कार्यालयात साडी, सलवार/चुडीदार कुर्ता, ट्राऊझर पँट व त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास दुपट्टा यासह पेहराव करावा. पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट/ ट्राऊझर पॅन्ट असा पेहराव करावा.

६) परिधान केलेला पेहराव स्वच्छ व नीटनेटका असावा याची दक्षता घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page