रुग्णालयात कोविड उपचार घेत असलेल्या महिलेचा विनयभंग
विरार : वसईतील एका नामांकित रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेचा रुग्णालयातील कर्मचाऱ्याने विनयभंग करून त्याचे छायाचित्र व्हॉट्सअॅपवर पाठवून १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात माणिकपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसईत राहणारी ४१ वर्षीय महिलेला करोनाचा संसर्ग झाला होता. उपचारासाठी ती वसईतील एका नामांकित रुग्णालयात दाखल झाली होती. उपचारादरम्यान ही महिला बेशुद्ध असताना रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने या महिलेचे कपडे काढून तिचे नग्न अवस्थेतील चित्रफीत आणि छायाचित्र काढले. यानंतर त्या महिलेला छायाचित्रे व्हॉट्सअॅप या समाजमाध्यमावर पाठवून १० लाख रुपयांची खंडणी मागितली खंडणी न दिल्यास ही छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली होती.
पीडित महिलेने याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली आहे. आरोपी विरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३५४, ३८५ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. त्याने यापूर्वी असा प्रकार केला आहे का, त्याचा पोलीस तपास करत आहेत.