तोतया अधिकारी बनून अनेकांकडून पैसे उकळणाऱ्या विनोद कुमार याला गांधी पार्क पोलिसांनी अटक केली आहे. त्याने उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील अनेकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळल्याची माहिती उघड झाली आहे.

अलीगढ: उत्तर प्रदेशच्या अलीगढ जिल्ह्यातील गांधी पार्क पोलिसांनी एका बोगस पोलीस अधिकाऱ्याला अटक केली आहे. विनोद कुमार असे या तोतया अधिकाऱ्याचे नाव असून, बुलंदशहरमधील डिबाई परिसरातील दानगढचा रहिवासी आहे. तीन वर्षे त्याने बोगस अधिकारी बनून अनेक जणांना धमकावले आणि त्यांच्याकडून पैसे उकळले, अशी माहिती उघड झाली आहे.

अलीगढ पोलिसांच्या माहितीनुसार, विनोद कुमार हा पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून लोकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे लुटायचा. तीन वर्षे त्याने तोतया पोलीस अधिकारी बनून अनेकांना लुटले. अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडील मोटरसायकल, दोन पॅन कार्ड, दोन आधार कार्ड आणि एक मतदान ओळखपत्र जप्त केले आहे. तसेच त्याच्याकडून बनावट गणवेशही जप्त केला आहे. त्याच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

आरोपी मोटरसायकलवरून खाकी वर्दीत बुलंदशहरच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना खबऱ्यांमार्फत माहिती मिळाल्यानंतर तपासणी नाक्यावर पोलिसांनी त्याला अडवले. त्याच्याकडे चौकशी केली असता, संशयास्पद आढळले. कसून चौकशी केली असता, त्याने खाकी वर्दीचा धाक दाखवून अनेकांना लुटल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडील बोगस कागदपत्रेही जप्त केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page