जुन्या भांडणातून सराईत गुन्हेगारांकडून घर जाळण्याचा प्रयत्न

जुन्या भांडणातून सराईत गुन्हेगारांकडून घर जाळण्याचा प्रयत्न

जुन्या भांडणातून सराईत गुन्हेगारांनी घरात घुसून एकाला शिवीगाळ, मारहाण करत घर जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि.८) महापालिका हौसिंग सोसायटी, महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा, भद्रकाली येथे घडली. याप्रकरणी महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा, भद्रकाली येथील चेतन बिगानिया (वय ३३) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी बागवानपुरा येथील संशयित अर्जुन राजू लोट, करण राजू लोट, कमल ऊर्फ बाबू रामपाल लोट, अक्षय रामपाल लोट यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सर्वजण रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणातून आग लावून घर जाळण्याचा चारजणांनी प्रयत्न केला. त्याचा जाब विचारला असता चेतन बिगानिया यांना चारजणांनी शिवीगाळ व मारहाण केली. त्यात ते जखमी झाले. चेतन बिगानिया घरात टीव्ही पाहत असताना बंद दाराखालून धूर येत असल्याने त्यांनी दार उघडून पाहिले. दारास आग लागलेली दिसली. संशयित चारजण बाहेर उभे असलेले दिसले. आग का लावली, अशी विचारणा बिगानियांनी चारजणांना केली. राग अनावर झाल्याने चारजणांनी घरात घुसून बिगानिया यांना मारहाण करत त्यांच्या भाऊ अर्जुन बिगानिया आणि राहुल बिगानिया यांनाही मारहाण करत जखमी केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एच. डी. राऊत करत आहे.

अभिप्राय द्या..