सत्तेच्या लालसेपोटी आणि घराणेशहांच्या अंतर्गत कसरतीवर जन्माला आलेले तिघाडी सरकार वर्षपूर्तीचे उसासे टाकत आहे, आणि कोरोना पेक्षाही घातक अशा शासन निर्णयांनी जनता मात्र मेटाकुटीला आली आहे.वॉटर स्पोर्ट (जलक्रीडा) व्यवसायाला कलेक्टर ऑर्डरने चालू करवून टाळ्या मिळवलेल्या स्थानिक राजकीय नेत्यांनी नेमके काय साध्य केले हे त्यांनाच ठावुक मात्र कोरोना काळात अनंत अडचणींना तोंड देत मालवण मधील समस्त व्यावसायिक पुनश्च स्थगितीने भांबावून गेले आहेत. पर्यटना सारख्या अत्यंत संवेदनशील व्यवसायाला असे धक्के कसे बरं सहन होऊ शकतात? एकतर मालवण मधील पर्यटकांमध्ये दरवर्षीसारखा उत्साह अजूनही दिसून येत नाहीय. कारण स्पष्ट आहे की मनोरंजना सारख्या चैनिच्या क्षेत्रात पैसा टाकताना “कोविडचा धडा” नक्कीच आठवत आहे. असे असून देखील जे काही पर्यटक आज मालवणच्या दिशेने येत आहेत त्यांना उत्सुकता होती ती वॉटर स्पोर्टची, याचा अनुभव पर्यटनाला हिरवा कंदील मिळल्यावरही येणारी पर्यटकांची रोडवलेली संख्याच सांगत होती. मात्र वॉटर स्पोर्ट मध्ये पर्यटकांना आपल्या दिशेने वळते करण्याची जादू आहे ही पर्यटकांच्या संख्येत झालेल्या वाढीने अधोरेखित होत आहे.
दरम्यान जलक्रीडा बंदच्या निमित्ताने ५ डिसेंबरला आक्रमक झालेले समस्त व्यावसायिक ६ तारीखच्या रात्री मुंबईला मंत्रालयाच्या दिशेने रवाना झाले. स्थानिक सत्तारूढ नेत्यांना मनातल्या मनात लाखोली वहात त्यांना मंत्री महोदयांच्या भेटीला रवाना व्हावेच लागले किंबहुना आर्थिक विवंचना, कुटुंब, मागे लागलेल्या बँका त्यांना कसे बरं शांत बसू देतील? स्वतः च्या हिमतीवर उभारलेले व्यवसायाला कोणत्याही स्थितीत जिवंत ठेवण्यासाठी त्यांना समस्त खात्याच्या मंत्र्यांची मनधरणी करण्या करिता मंत्रालय गाठावे लागले ही त्यांची अपरिहार्यता होती.
“गरजेच्या वेळी धावून येतो तोच खरा मित्र” ही म्हण सर्वश्रुत आहे, लोकशाहीत देखील आपल्या हिताचा पक्ष ओळखणे हे कोविड सारख्या प्रतिकूल परिस्थितीत सामान्य जनतेला समजून घेणे नक्कीच एक संधी आहे. अरे कसली घेता श्रेय? कसली करता उद्घाटनं? व्यावसायिकांच्या नानाविध करातूनच घेतलेल्या पैशांवर करता ना सगळं? अशा प्रकारची मुस्कटदाबी करत निर्बंध घालत प्रशासनातील भ्रष्टाचार वाढविण्यासाठी पलीकडे आणखी काय साध्य होणार? वॉटर स्पोर्ट स्थगितीच्या निमित्ताने तिघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या निमित्ताने अशा घराणेशहांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी, मतदारांनी “शितावरून भाताची परीक्षा” केली पाहिजे. आणि अशा प्रकारचे फसवे, अहंकारी, प्रलोभनात्मक निर्णय घेणाऱ्या, शासन अधिकारांचा आकसाने वापर करणाऱ्या पक्षांना, नेत्यांना आगामी मतदानात जागा दाखवणे आवश्यक आहे.असे भाजपा जिल्हा चिटणीस बंड्या सावंत यांनी कुडाळ येथे मीडियाशी बोलताना सांगितले.