ग्लोबल टीचर हा सात कोटींचा पुरस्कार मिळाल्याने डिसले गुरुजी चर्चेत
ग्लोबर टीचर रणजीत डिसले करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. रणजीत सिंह डिसले यांनी Whats App स्टेटस ठेवून ही माहिती दिली आहे. लक्षणे दिसत असल्याने मी कोविड टेस्ट करुन घेतली आहे. ती पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी करोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन डिसले सरांनी केलं आहे. नुकतीच त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
मुंबईहून बार्शीला परतल्यानंतर डिसलेसरांना थकवा व इतर त्रास जाणवू लागला. त्यांच्या पत्नीला त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांची करोना संबंधित चाचणी घेण्यात आली असता डिसले दाम्पत्य करोनाबाधित आढळून आले. इतर कुटुंबीयांची चाचणी नकारात्मक आली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने स्वतःहू करोना चाचणी करून घ्यावी. यात कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करू नये, असे आवाहन केले आहे.
कोण आहेत रणजीत डिसले?
युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार रणजीतसिंह डिसलेंना जाहीर झाला. सात कोटींचा हा पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झाला. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी यासंदर्भातली घोषणा केली. असा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा आहे.
आजच त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही त्यांनी मंगळवारी भेट घेतली होती. तर त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही ते भेटले होते. आता त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना करोना चाचणी करुन घेण्याचं आवाहन केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रणजीतसिंह डिसले यांचं कौतुक केलं होतं. तसंच डिसलेसरांनीही आपल्याला शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करायची आहे असं राज ठाकरे यांना सांगितलं होतं. महाराष्ट्राची मान डिसले सरांमुळे जगात उंचावली आहे अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती.