अमृत योजनेअंतर्गत चार वर्षांत केवळ ४ जलकुंभ

वसई: शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे तुडुंब भरली असली आणि शहरासाठी मुबलक पाणी असले तरी शहराच्या अनेक भागात पाणी पोहोचलेले नाही. कारण पाण्याचे वितरण करण्यासाठी आखण्यात आलेली अमृत योजना रखडली आहे. ठेकेदाराने मागील ४ वर्षांत केवळ ४ जलकुंभ बांधलेअसून जलावहिन्यांचे कामही अर्धवट ठेवले आहे. आता पालिका आयुक्तांनी या ठेकेदाराची हकालपट्टी केली असून नवीन ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात आहे. पूर्वी शहराला सूर्या, ऊसगाव, पेल्हार आणि पापडखिंड धरणातून १३१ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जात होता. वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन सूर्या पाणी प्रकल्पाच्या दुसम्ऱ्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली आणि ते काम पूर्ण झाले. यामुळे शहराला १०० दशलक्ष लिटर्स अतिरिक्त पाणी मिळू लागले. यामुळे शहराचा पाणीसाठा वाढला आहे. सध्या शहराला दररोज २३० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. त्यामध्ये सूर्या धरणातून २०० दशलक्ष लिटर्स , पेल्हारमधून १०, ऊसगाव धरणातून २० आणि पापडखिंड धरणातून १ दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जातो.    सर्वांना पाणी मिळावे यासाठी पालिकेने २०१६ मध्ये १३९ कोटींच्या अमृत योजनेला मंजुरी दिली होती. या योजनेचा  उद्देश शहराच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचविणे हा होता. या योजनेअंतर्गत १८ जलकुंभ उभारणे तसेच ३८४ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्याच्या कामाचा समावेश होता. शहरात असलेल्या जुन्या जलवाहिन्या कमी व्यासाच्या होत्या. तसेच त्या गंजल्याने नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळायचे.

या सर्व जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार होत्या. मात्र ही योजना रखडली आहे.  ३८४ किलोमीटरच्या जलवाहिन्यांपैकी केवळ १८२ किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. यामुळे पाणी असूनही शहरातील नागरिक पाण्यापासून वंचित राहिलेले आहेत. शहराच्या  पश्चिम पट्टय़ातील गावांचा भाग महापालिकेत येतो. त्यांना अद्याप पाणी मिळालेले नाही. तसेच शहराच्या अनेक भागात जलवाहिन्याच नसल्याने त्यांना पाणी देता येत नाही. मुबलक पाणी असल्याने मागेल त्याला नळजोडणी अशी पालिकेची भूमिका आहे. परंतु ठेकेदाराच्या अकार्यक्षमतेचा त्याला फटका बसला आहे. नळ जोडणीचे अर्ज करणाम्ऱ्यांना त्यांच्या भागात जलवाहिन्या नसल्याने नळजोडणी देता येत नाही.  पालिकेचे आयुक्त गंगाथरन डी ठेकेदाराच्या अकार्यक्षमतेवर संतप्त झाले आहेत. त्यांनी या ठेकेदाराकडून काम काढून घेण्याचे आदेश दिले असून नवीन ठेकेदार नेमण्याचा निर्णयम् घेतला आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. ठेकेदाराने एकूण ८ जलकुंभ बांधले त्यापैकी ४ पूर्ण झाले असून उर्वरित ४ जलकुंभांचे काम सुरू केलेले आहे, अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.

ठेकेदाराने अतिशय संथगतीने काम केले आहे. त्यामुळे ठेकेदाराची हकालपट्टी करण्यात आली आहे. या ठेकेदाराने १८ जलकुंभ दोन वर्षांत बनविणे अपेक्षित होते. मात्र त्याने अवघे ४ जलकुंभ बनवले आहेत. परिणामी शहराला पुरेसा पाणीपुरठा होत नाही आणि अनेक भागात पाणी असूनही ते देता आलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page