नवरा-बायकोमध्ये काहीना काही कारणांमुळे सतत खटके उडतच असतात. पण, इटलीमधून एक अनोखी घटना समोर आलीये. एका दाम्पत्यामध्ये कशावरुन तरी खटके उडाले, त्याचा पतीला इतका राग आला की त्याने स्वतःचा राग शांत करण्यासाठी तब्बल 450 किलोमीटरपर्यंतची पायपीट केली. नाइट कर्फ्यूचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, तेव्हा कुठे तो थांबला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्या व्यक्तीने पत्नीशी भांडण झाल्यामुळे स्वतःचा राग शांत करण्यासाठी 450 किलोमीटरपर्यंतची पायपीट केल्याचं सांगितलं. एका आठवड्यापासून त्याची ही पायपीट सुरू होती.

450 किलोमीटरपर्यंत केली पायपीट :-
48 वर्षांचा हा व्यक्ती इटलीच्या कोमा शहरात राहतो. पत्नीशी झालेल्या भांडणानंतर तो चालत-चालत फोनो शहरात पोहोचला. दोन्ही शहरांमधील अंतर तब्बल 426 किलोमीटर आहे. फोनो पोहोचल्यानंतर हा व्यक्ती अजून 30 किमी चालून एड्रिएटिक कोस्टजवळ पोहोचला. कोस्टल हायवेवर असलेल्या  पोलिसांनी त्याला रात्री दोनच्या सुमारास ताब्यात घेतलं. इतक्या लांब पायपीट करण्याचं कारण सांगितल्यावर पोलिसही हैराण झाले. “मला पत्नीचा इतका राग आला होती की मलाच कळलं नाही मी इतक्या लांब चालत आलो. मी केवळ स्वतःचा राग शांत करण्यासाठी घरातून पायी निघालो होतो. रस्त्यात अनोळखी लोकांनी मला भोजन दिलं”, असं त्याने पोलिसांना सांगितलं.

पत्नीने भरला 400 युरो दंड :-
नंतर पोलिसांनी त्याचे ओळखपत्र तपासले असता त्याच्या पत्नीने आठवड्याभरापूर्वीच पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्याचं समजलं. पोलिसांनी लगेच त्याच्या पत्नीशी संपर्क करुन माहिती दिली. पतीच्या सुटकेसाठी त्याची पत्नी फोनोला पोहोचली आणि 400 युरो इतका दंड भरुन तिने पतीची सुटका केली. करोना व्हायरसमुळे लागू असलेल्या नाइट कर्फ्यूचं उल्लंघन केल्यामुळे हा दंड आकारण्यात आला. दरम्यान, स्थानिक माध्यमांनी हे वृत्त दिल्यापासून इटलीच्या सोशल मीडियामध्ये याबाबत चांगलीच चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page