Andhra Pradesh Mysterious Disease : आंध्र प्रदेशात एका रहस्यमय आजारानं एकाचा मृत्यू झालाय तर जवळपास ३०० जण रुग्णालयात दाखल झालेत. दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयातल्या डॉक्टरांचं एक विशेष पथक एलुरूला दाखल झालंय.
आंध्र प्रदेशातील एलुरूमध्ये एका अज्ञात आजारानं थैमान घातलंय. या रहस्यमय आजारानं जवळपास ३०० लोक रुग्णालयात दाखल झालेत. त्यातच रविवारी एका व्यक्तीला आपल्या प्राणालाही मुकावं लागलं.
हा आजार नेमका काय आहे? आणि तो कोणत्या कारणानं फैलावला गेला? याबाबत मात्र डॉक्टारांसमोरही प्रश्नचिन्ह कायम आहे. या आजारात अनेक लोक अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळत आहेत. अचान फीट येणं, बेशुद्ध पडणं, अंग थरथर कापायला लागणं आणि तोंडातून फेस येणं अशी लक्षणं रुग्णांमध्ये दिसत आहेत. या नवीन आजारानं डॉक्टरही चक्रावले आहेत.
एकाचा मृत्यू
या आजारानं पीडित एक रुग्ण विजयवाडाच्या सरकारी रुग्णालयात दाखल झाला होता. या ४५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. चक्कर आल्यानंतर या रुग्णाला अपस्माराचा झटका (फीट येणं) आला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
शनिवारी एलुरुमध्ये चार वेगवेगळ्या भागांतून जवळपास ४५ रुग्णांमध्ये अजब लक्षणं आढळली होती. विशेष म्हणजे या रुग्णांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. रुग्णालयात दाखल रुग्णांमध्ये ४६ मुलांचा तर ७० महिलांचा समावेश आहे.
पश
‘एम्स’ डॉक्टरांची विशेष टीम
या आजाराची माहिती मिळताच दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयातल्या डॉक्टरांचं एक विशेष पथक एलुरूला दाखल झालंय. रुग्णांकडून विस्तृत माहिती घेत या आजाराची माहिती घेतली जातेय. स्थानिक आरोग्य आयुक्त कटमानेनी भास्कर हेदेखील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एलुरूला दाखल झाले आहेत.
नमुन्यांच्या चाचणीच्या अहवालाची प्रतिक्षा
स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयवाडा आणि विशाखापट्टनमच्या लॅबमध्ये रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सेरेब्रल-स्पायनल फ्लुएड सॅम्पल रिपोर्ट आल्यानंतर या आजाराचा खुलासा होऊ शकेल. तज्ज्ञांकडून हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण तर दुधाद्वारे केमिकल पॉयजनिंग असा अनेक अँगलने चौकशी केली जातेय.