मुंबईत २२ लाख रुपये किंमतीचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. तर तीन विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेले कोकेन अंदाजे २२ लाख रुपये किंमतीचे आहे.
मुंबई पोलिसांनी ड्रग तस्करांविरोधात मालाड येथे मोठी कारवाई केली आहे. तीन विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली असून, २२ लाख रुपये किंमतीचे कोकेन हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबईतील झोन ११ च्या पोलीस उपायुक्तांनी ड्रग तस्करांविरोधात धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. विशेष पोलीस पथकाला खबऱ्यांकडून माहिती मिळाली. मालाड पश्चिमेकडे कोकेन विक्रीसाठी उके जेम्स (वय ३५) हा येणार असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या विशेष पथकाने सापळा रचला आणि त्याला अटक केली. त्याच्याकडून १०.१४ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले.
या प्रकरणी त्याच्याविरोधात बांगुर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून, त्याला कोर्टात हजर करण्यात आले. त्याला ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
आरोपीला गुरुवारी पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गोरेगाव पूर्वेकडून इमेका सिप्रिआन आणि जोसेफ या दोघांना अटक केली. आरोपींकडून एकूण २२०.१४ ग्रॅम कोकेन (अंदाजे २२, ०१,४०० रुपये) जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.