मालवण / –

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांना आज कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर आणि प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले यांच्या हस्ते भारतज्योती प्रतिभा सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करत गौरविण्यात आले.

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलनामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांना भारतज्योती प्रतिभा सन्मान पुरस्कार २४ ऑगस्ट रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या ८५ मानकऱ्यांमध्ये डॉ. सुमेधा नाईक यांचा समावेश होता. कोरोनाच्या वातावरणामुळे हा पुरस्कार पोस्टाने पाठवण्यात आला होता.
आज संस्थेच्यावतीने आयोजित वेबसाईट उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात सन्मान चिन्ह, मानपत्र, गौरव पदक,
मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र या स्वरूपातील हा राज्यस्तरीय पुरस्कार डॉ. सुमेधा नाईक यांना प्रदान करण्यात आला. यावेळी कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे सचिव चंद्रशेखर कुशे, साईनाथ चव्हाण, संदेश कोयंडे, प्रमोद ओरसकर, भाऊ सामंत, शशिकांत झांट्ये, सुधीर धुरी तसेच संस्थेचे इतर मान्यवर संचालक व सदस्य उपस्थित होते. तसेच सिंधुदुर्ग महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. नाईक यांचे अभिनंदन केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाचा कणा असणाऱ्या हॉटेल व्यवसायाच्या सेवा गुणवत्तेविषयी सादर केलेल्या संशोधनपर योगदानाची दखल घेवून मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेकडून डॉ. सुमेधा नाईक यांना भारतज्योती प्रतिभा सन्मान पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.
आपल्या मनोगतामध्ये डॉ. नाईक यांनी संस्थेचे, अध्यक्षांचे महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे व आपल्या कुटुंबाचे संशोधनास प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार मानले. तसेच मनुष्यबळ विकास लोकसेवा संस्थेचे संस्थापक अॅड. कृष्णाजी जगदाळे यांचेही आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page