Coronavirus updates: करोनाचे थैमान सुरू असताना अनेकांच्या मनात या आजाराबद्दल अनावश्यक भीतीदेखील निर्माण झाली आहे. मात्र, १०१ वर्षाच्या आजींपासून सगळ्यांना प्रेरणा मिळू शकते. या आजींनी दोन वेळेस करोनाला मात दिली असून आता तिसऱ्यांदाही करोनाची बाधा झाल्यानंतर त्यांची प्रकृती चांगली आहे.
रोम: करोनाच्या संसर्गाची बाधा वृद्धांना लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे वयस्कर, वृद्धांची अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले जाते. इटलीतील १०१ वर्षाच्या आजींना काही महिन्यांच्या अवधीत तिसऱ्यांदा करोनाची बाधा झाली आहे. याआधी दोन वेळेस या आजींनी करोनाला मात दिली. आता तिसऱ्यांदा करोनाची लागण झाली असली झाली असली त्यांची प्रकृती चांगली असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.
मारिया ऑरसिंघेर असे या आजींचे नाव आहे. जवळपास ९ महिन्यात तीन वेळेस त्यांना करोनाची बाधा झाली आहे. मारिया यांना पहिल्यांदा फेब्रुवारी महिन्यात करोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी इटलीमध्ये करोनाच्या संसर्गाने थैमान घातले होते. करोनाच्या संसर्गामुळे अनेक वृद्धांचा मृत्यू झाला होता. मात्र, या आजींनी करोनासोबतची लढाई जिंकली. आईला करोनाची बाधा झाल्यानंतर आम्ही खूप घाबरलो होतो. इतर वृद्धांचा मृत्यू होत असल्यामुळे आमच्या भीतीत आणखी भर पडली. मात्र, काही दिवसांत आईने करोनावर मात केली होती, असे त्यांची मुलगी कार्ला यांनी सांगितले. करोनाच्या रुग्ण लवकर बरे होत नसताना आईची प्रकृती काही दिवसांत बरी झाली होती. डॉक्टरांनीही यावर आश्चर्य व्यक्त केले असल्याचे कार्ला यांनी सांगितल
जुलै महिन्यात मारिया यांचा १०१ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना सप्टेंबर महिन्यात पुन्हा करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात तिसऱ्यांदा करोनाची लागण झाली. सध्या मारिया आजी या घरीच विश्रांती घेत असून करोनाची लक्षणे आढळली नाहीत. त्याशिवाय त्यांना श्वास घेण्यासही कोणताच त्रास होत नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा त्या करोनाला परतवून लावतील असा विश्वास त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. या आजाींनी स्पॅनिश फ्लू, दुसऱ्या महायुद्धाच्या संकटाचा काळ पाहिला आहे. त्यातूनही त्या सुखरूप बचावल्या आहेत.
भारतात ही करोनाच्या संसर्गावर मात केलेले १०० हून अधिक वयाचे काही बाधित रुग्ण आहेत. केरळमधील १०३ वर्षांचे पुराक्काट वेट्टील पारिद यांनी ऑगस्टमध्ये करोनावर मात केली होती. तर, महाराष्ट्रातील ठाण्यातील १०६ वर्षाच्या आनंदीबाई पाटील यांनी सप्टेंबरमध्ये करोनाला हरवले होते.