‘बंदी’ आदेशाविरोधात मालवणातील संतप्त पर्यटन व्यवसाईकांनी बंदर अधिकाऱ्याना घेराव घालत स्पष्ट केली भूमिका..

मालवण /-

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आम्ही वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय सुरू केले. कोरोना काळात ठप्प असलेला वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय पुन्हा एकदा पूर्वपदार येत असताना बंदर विभाग आडमुठे धोरण राबवून आमच्यावर कारवाई करणार असेल तर खुशाल कारवाई करा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नियमांचे पालन करत आम्ही आमचे व्यवसाय सुरू ठेवणार. अशी भूमिका मालवणातील वॉटर स्पोर्ट्स व्यवसाईकांनी बंदर अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केली.

केवळ बंदर विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून कोरोना खबरदारी नियमावली प्राप्त नाही असे कारण पुढे करून वॉटर स्पोर्ट्स बंद करा असे आदेश दिले जात असतील. अनेकांचे रोजगार हिरावले जात असतील तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही व्यवसाय सुरूच ठेवणार. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व नियमांचे पालन करून आम्ही केलेला व्यवसाय, दिलेली पर्यटन सेवा बंदर विभाग अनधिकृत ठरवत असेल तर आम्ही कारवाईस तयार आहोत. मात्र वॉटर स्पोर्ट्स सुरूच राहणार असेही पर्यटन व्यवसाईकांनी स्पष्ट केले आहे.

बंदर विभागाच्या बंदी आदेश व कारवाई भूमिके विरोधात मालवण, तारकर्ली, देवबाग, दांडी, चिवला येथील शेकडो पर्यटन व्यवसाईकांनी बंदर कार्यालयावर धडक देत, भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, वरिष्ठांच्या आदेशाने वॉटर स्पोर्ट्स बंद ठेवण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर यांनी सांगितले.

आम्ही कर्जबाजारी झालो आहोत. पुन्हा बंदी आल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. पूर्वपदावर आलेले पर्यटन ठप्प होईल. या परिस्थितीचा विचार करता जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कोरोना खबरदारी नियमानुसार पर्यटकांच्या सुरक्षेची सर्वाधिक काळजी घेत पर्यटन व्यवसाय सुरू ठेवणार असल्याचे पर्यटन व्यवसाईकांनी स्पष्ट केले.

यावेळी पर्यटन व्यवसाईक अन्वय प्रभू, सतीश आचरेकर, मनोज मेथर, फ्रान्सिस फर्नांडिस,बाबली चोपडेकर, राजन कुमठेकर, मनोज खोबरेकर, रमेश कद्रेकर, वैभव खोबरेकर यासह शेकडो व्यवसाईक उपस्थित होते. महेश जावकर, दिलीप घारे यासह काँग्रेसचे बाळू अंधारी व अरविंद मोंडकर यांनीही व्यवसाईकांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. बंदर विभागाच्या मार्गदर्शक सूचना (एसओपी) सोमवार पर्यत मिळण्यासाठी आम्हीही मंत्री स्तरावर पाठपुरावा करत असल्याचे मोंडकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page