तुमची बडबड बंद व्हावी म्हणून विदर्भातील मतदारांचा महाविकास आघाडीला कौल; राऊतांची फडणवीसांवर टीका
फडणवीस यांनी बडबड बंद करावी. सरकारवर आमचा विश्वास आहे. हा सल्ला विदर्भातील जनतेने दिला आहे, असे विनायक राऊत म्हणाले.

“भारतीय जनता पक्षाला मतदारांनी 100 टक्के धुडकावून लावले आहे. विदर्भ, नागपूरमध्ये भाजपचा पराभव झाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बडबड बंद करावी; महविकास आघाडी सरकारवर आमचा विश्वास आहे. हा सल्ला विदर्भातील जनतेने दिला आहे,” अशी खोचक टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. जिल्ह्यातील तुळजापूर येथील मुद्गलेश्वर मंदिरात मीनाताई ठाकरे यांच्या स्मरणार्थ विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

विधानपरिषदेच्या नागपूर मतदारसंघात  भाजपची पिछेहाट झाली. मागील 55 वर्षांपासून या जागेवर भाजपचे प्राबल्य होते. यावेळी मात्र, ही जागा महाविकास आघाडीने खिशात घातली. या ठिकाणी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजय मिळवला. तर भाजपचे उमेदावार संदीप जोशी  यांना पराभव पत्करावा लागला. यावर विनायक राऊत यांनी भाष्य केले.

तसेच, अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर आहेत. या मतदारसंघात भाजप आणि महाविकास आघाडीचे उमेदवार पिछाडीवर आहेत. या दोन्ही मतदारसंघातील जय पराजयाविषयी विनायक राऊत यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढले.

फडणवीसांनी बडबड बंद करावी
“भारतीय जनतेला मतदारांनी 100 टक्के धुडकावून लावले आहे. विदर्भ, नागपूरमध्ये भाजपचा पराभव झाला. देवेंद्र फडणवीस यांनी बडबड बंद करावी; महाविकास आघाडीवर आमचा विश्वास आहे, असा संदेश विदर्भातील जनतेने दिला,” अशी खोचक टीका राऊत यांनी केली. तसेच भाजपने विरोधी पक्षात काम करायचे आहे, हा संदेश महाराष्ट्रातील जनतेने दिला. या संदेशाचे भाजपने तंतोतंत पालन करावे,” असा सल्लाही यावेळी खासदार राऊत यांनी भाजपला दिला.

अमरावतीत भाजपचा उमेदवार सहाव्या क्रमांकावर
यावेळी बोलताना त्यांनी अमरावती शिक्षक मतदारसंघातील होत असलेल्या पराभवावरही प्रतिक्रिया दिली. “या मतदारसंघात पैशांचे वाटप झाले. याबाबत तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली. देवेंद्र फडणवीस शिवसेनेला हिणवत आहेत. पण ते त्यांच्या घरतला उमेदवार वाचवू शकले नाहीत. अमरवतीत भाजपचा उमेदवार सहाव्या क्रमांकावर फेकला गेला,” अशी टीका राऊत यांनी केली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page