वैभववाडी येथे दोन दिवसीय भाजपा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न-
वैभववाडी /-
सध्याच्या युगात सोशल मीडिया हे प्रसार माध्यमाचे प्रमुख साधन आहे.सामाजिक, राजकीय क्षेत्रात तसेच व्यक्तिमत्व विकासात सोशल मीडियाचा प्रभावी वापर होणे फार गरजेचे आहे.असे आवाहन आ.नितेश राणे यांनी केले.
भाजपा महाराष्ट्र प्रशिक्षण विभाग आयोजित वैभववाडी मंडल प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम एडगाव येथील सुमित्रा मंगल कार्यालय येथे पार पडला. या वेळी ते बोलत होते.
पुढे आ.नितेश राणे म्हणाले,भारत देश इंटरनेट वापरात इतर देशांच्या तुलनेत अग्रेसर आहे. मानवाच्या मूलभूत गरजमध्ये मोबाईल ही देखील प्रमुख गरज बनली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षा वाढत आहेत. सोशल मीडियाचा वापर विचार पोहोचवण्यासाठी झालाच पाहिजे. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांना व नागरिकांना कशा प्रकारे चांगला फायदा होत आहे. त्यांचा आर्थिक स्तर उंचावत आहे. यावर सोशल मीडियातून प्रत्येकाने व्यक्त झाले पाहिजे. राज्यातील महाविकास आघाडीने जनतेला वर्षभरात कसं फसवलं, हे देखील सोशल मिडीयाच्या पोस्ट मधून जनतेपर्यंत पोहचवीणे ही प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. संवाद यामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे.
प्रशिक्षण वर्गाच्या समारोप प्रसंगी आमदार नितेश राणे बोलत होते. सोशल मीडियाचा प्रभाव व वापर या विषयावर त्यांनी प्रशिक्षणार्थींना संबोधित केले. सत्राच्या अध्यक्षस्थानी पं. स. सभापती अक्षता डाफळे उपस्थित होत्या.
आ. नितेश राणे म्हणाले, सन 2014 मध्ये गावात, वाड्यावस्त्यात रस्ता व पाणी आदी विकास कामे करा, अशी मागणी होत होती. सन 2020 मध्ये गावात मोबाईल टॉवर उभारा ही प्रामुख्याने मागणी होताना दिसत आहे. टॉवर द्या नाहीतर निवडणुकांवर बहिष्कार घालू अशी प्रतिक्रिया गावागावातून येत होती.
नवीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. ते आपापल्या ग्रुप वर प्रत्येकाने प्रभावीपणे मांडले पाहिजे. मविआने एक वर्ष पूर्ण केले. वर्षभरात ते कसे अपयशी ठरले. त्यांची आश्वासने कशी फोल ठरली. यावर आपल्या मीडियावर किती पोस्ट आल्या. पोस्ट करत नसाल तर भाजपला आपल्याकडून काय फायदा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वातावरण निर्मिती, आक्रोश व राग व्यक्त करण्यासाठी यासारखे दुसरे अस्त्र असू शकत नाही.
डिसेंबर 2019 मध्ये अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी देऊ, कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार देऊ, कोरोनात वीज बिले माफ करू व दिवाळीला चांगली भेट देऊ असे सांगितले. यातलं काहीही दिलेलं नाही. याची चर्चा या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांनी केली पाहिजे.
आ. राणे पुढे म्हणाले, वर्च्युअल सभा घेणारा भाजपा हा देशातील एकमेव पक्ष आहे. तंत्रज्ञानाचा वापर यापुढे जास्त प्रमाणात होणार आहे. याचा प्रत्येकाने विचार करा. स्वतःच गुडविल तयार करा.
जिल्हा बँकत चुकीच्या पद्धतीने नोकर भरती व पालकमंत्री उदय सामंत यांच्या कार्यपद्धती वर आ. नितेश राणे यांनी टीका केली.
अशाच प्रशिक्षण वर्गा प्रमाणे सोशल मीडियाचा वापर कशा प्रकारे करावा, याचे प्रशिक्षण वर्ग घेण्याची माझी तयारी आहे. या क्षेत्रातील तज्ञ मंडळींना या वर्गाला उपलब्ध करेल. फक्त तुमची इच्छाशक्ती असली पाहिजे. मात्र माझ्यासाठी अशा पद्धतीने झालेले प्रशिक्षण फार मोठी गुंतवणूक ठरेल असे सांगितले. प्रशिक्षण वर्ग यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंडळ अधिकारी नासीर काझी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. पार पडलेल्या नियोजनबध्द प्रशिक्षणाचे उपस्थित वक्त्यांनी व मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळा हरयाण, आभार नासीर काझी यांनी मानले.