मालवण /-
पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या तारकर्ली गावात बुधवारी रात्री बेधुंद पर्यटकांनी स्थानिक ग्रामस्थांना मारहाण केल्याची घटना घडली. पर्यटकांच्या कारने दुचाकीस्वरास धडक दिली, याचा जाब विचारण्यास गेलेल्या ग्रामस्थांना ही मारहाण करण्यात आली.
दरम्यान, या घटनेनंतर गावातील ग्रामस्थ संतप्त बनले. त्यांनी पर्यटकांना थेट पोलीस ठाण्यात नेले. यावेळी दोन पक्षाचे जिल्हास्तरावरील स्थानिक नेते त्याठिकाणी हजर झाले. पोलीस ठाण्यात तासभर रंगलेल्या चर्चेनंतर कोणतीही तक्रार न देण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्याबाहेर बहुसंख्य ग्रामस्थांची गर्दी होती.
मुंबई येथून आलेले पर्यटक बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तारकर्ली मार्गावरून माघारी परतत असताना एका दुचाकीस्वरास त्या पर्यटकांच्या कारची धडक बसली. स्थानिक ग्रामस्थांनी काही अंतरावर कार थांबवून याबाबत जाब विचारला. त्यावेळी कार चालक व कारमधील अन्य व्यक्ती व महिलांनी अर्वाच्च भाषा वापरली. यामुळे वाद निर्माण झाला.
तारकर्ली मार्गावरच पर्यटक व स्थानिक यांच्यात वाद भडकला. यावेळी एका स्थानिकास मारहाण करण्यात आली. यामुळे स्थानिक ग्रामस्थ अधिकच संतप्त बनले. वाद वाढला यावेळी एका स्थानिक ग्रामस्थांच्या डोक्यावर दगड मारून रक्तबंबाळ करण्यात आले. पर्यटक कारमधील कोणीतरी दगड मारल्याचे स्थानिकांनी सांगितले.
युवतीच्या केसांना धरून हातावर नखांनी ओरबडले
एका ग्रामस्थाला मारहाण एका ग्रामस्थांच्या डोक्यावर दगड मारण्याचा प्रकार बेधुंद पर्यटकांकडून घडल्याने बहुसंख्य ग्रामस्थ एकवटले. स्थानिक महिलाही पुढे आल्या. यावेळी पर्यटक कारमधील महिलांनी एका स्थानिक युवतीच्या केसाला धरून ओढले. नखांनी तिच्या हातावर ओरबडले. यामुळे सहनशीलतेचा अंत झालेल्या ग्रामस्थांनी पर्यटकाना पोलीस ठाण्यात नेत कारवाईची मागणी केली. रात्रौ उशिरा बहुसंख्य ग्रामस्थ एकवटले होते.
पर्यटकांवर कारवाईसाठी ग्रामस्थ एकवटले. यावेळी दोन पक्षाचे नेते त्या ठिकाणी हजर झाले. तासभर पोलीस ठाण्याच्या एका केबिनमध्ये झालेल्या चर्चेअंती दोन्ही बाजूकडून कोणतीही तक्रार नाही. अशी लेखी भूमिका पोलिसांनी नोंद करून घेतली. त्यामुळे कोणतीही तक्रार दाखल झाली नाही.
अश्या पर्यटकाना लगाम गरजेचा ..
मालवणात दरवर्षी लाखो पर्यटक येतात. बहुसंख्य पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटतात मौजमजा करतात. त्यांचा कुठलाही त्रास स्थानिकांना नसतो. मात्र काही वेळा दारू पिऊन धिंगाणा घालणे, बेदरकार गाड्या चालवणे, अपघात करून पळून जाणे, अरेरावी करणे असे प्रकारही काही पर्यटकांकडून घडतात. बहुतांश वेळा वाद नको, मालवणची बदनामी नको म्हणून स्थानिक व पर्यटन व्यवसाईक शांततेची भूमिका घेतात. मात्र काही बेधुंद पर्यटकांकडून सातत्याने असे प्रकार घडत असतील तर अश्या पर्यटकाना लगाम घालणे गरजेचे आहे. असा सूर मालवण वासीयांकडून या निमित्ताने व्यक्त होत होता.