नेरूर येथे जिल्हास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न..

कुडाळ /-

महाराष्ट्र शासनाने यावर्षी भात पिक खरेदीसाठी १८६८ रु हमीभाव व ७०० रूपये बोनस रक्कम जाहीर केली आहे. त्यामुळे शेतक-यांनी जास्तीत जास्त भात विक्री शासकीय यंत्रणेद्वारेच करावी तसेच शेतक-यांनी शेतीसह काजू व विविध पिके घेऊन कृषी क्षेत्रात क्रांती करावी असे आवाहन कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी नेरूर येथे केले.

महाराष्ट्र शासन कृषि विभाग, तालुका कृषि अधिकारी कार्यालय तथा कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ), कुडाळ यांच्या मार्फत शुक्रवारी फडके हॉल, नेरूर देऊळवाडा (चव्हाटा) येथे काजू लागवड तंत्रज्ञान व किड/रोग व्यवस्थापन, कृषी विभागाच्या योजना इत्यादी विषयांवर जिल्हास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाला.

यावेळी जि.प.सदस्य अमरसेन सावंत, कुडाळ उपसभापती जयभारत पालव, तालुका कृषि अधिकारी आर.डी.कांबळे, पं.स. सदस्या सौ. अनघा तेंडोलकर, सरपंच शेखर गावडे, उपसरपंच समद मुजावर, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्लेचे किटक व रोग शास्त्रज्ञ डाॅ. गजबिये, डाॅ.देसाई, डाॅ.गुरव, आत्मा कमिटी अध्यक्ष बाजीराव झेंडे, आत्मा अंतर्गत शेतकरी सल्ला समिती सदस्य विजय लाड, दिपश्री नेरूरकर, कृषि पर्यवेक्षक, एस.एल.खरवडे, कृषिसहाय्यक एस.एस.चव्हाण, पोलीस पाटील गणपत मेस्त्री, तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर गावडे, प्रगतशील शेतकरी शरद धुरी, जि.प.चे माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, तालुकाप्रमुख राजन नाईक, अतुल बंगे, रूपेश पावसकर आदींसह ग्रा.पं.सदस्य, कृषी अधिकारी व कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ.वैभव नाईक यांनी या प्रशिक्षणाला शुभेच्छा देऊन कुडाळ तालुका कृषि विभागाच्या कामकाजाबद्दल गौरवोदगार काढले. फळसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डाॅ.गजबिये यांनी काजू पिकाचे आर्थिकदृष्ट्या महत्व, काजू लागवड तंत्रज्ञान व व्यवस्थापन, काजूच्या विविध जाती याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर डाॅ.देसाई यांनी काजू पिकावरील किड व रोग याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page