कुडाळ /-
बिगर परवाना बंदुक घेऊन शिकारीच्या उद्देशाने घराशेजारील जंगलात गेलेल्या हळदीचे नेरूर येथील युवराज वारंग (१८) या तरुणाचा बंदुकीची गोळी लागुन जागीच मृत्यू झाला. आज दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास युवराज वारंग घरा शेजारील जंगलात बिगर परवाना बंदुक घेऊन शिकारीच्या उद्देशाने गेला होता. यावेळी काही वेळाने मोठ्याने बंदुकीच्या गोळीचा आवाज झाला म्हणून त्याचे काका त्या ठिकाणी धावत गेले असता युवराज हा जमिनीवर पडलेल्या स्थितीत होता. बाजुला बंदुक पडलेली होती. जवळून पाहीले असता युवराजच्या छातीत बंदुकीची गोळी लागल्याचे दिसुन आले व त्यातच त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती त्याच्या काकाने दिली, असुन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. युवराज एकटाच गेला होता की, त्याच्या सोबत अन्य कोण गेले होते, त्याने बंदुक कोठुन आणली याचा ही तपास केला जाणार असल्याची माहिती कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली. अधिक तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.