जिल्हाधिकाऱ्यांना वीजबिल माफ करण्यासंदर्भात दिले निवेदन..
सिंधुदुर्गनगरी /-
भरमसाठ वीज बिलाने हैरान झालेल्या जनतेला विजबिल माफी झालीच पाहिजे. या मागणीसाठी व शासनाच्या वीजबिल दरवाढीविरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला तर आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. कोरोना च्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यापासून कडक टाळेबंदी मुळे नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. उद्योग व्यवसायांना घरघर लागली आहे. अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. तर एका बाजूला आजाराची भीती आणि दुसरीकडे ठप्प झालेले अर्थकारण या दोन्ही आघाड्यावर नागरिक लढा देत असताना महा विकास आघाडी सरकारने नागरिकांना प्रचंड वीज बील पाठवून शॉक दिला आहे. या भरमसाठ विज बिल दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला . मनसे नेते परशुराम (जीजी) उपरकर यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या मोर्चात मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, राजन दाभोलकर, यांच्यासह प्रवीण मर्गज, नंदू घाडी, प्रसाद गावडे, विनोद सांडव, दत्ताराम बिड वाडकर , चंदन मेस्त्री, सचिन तावडे, सुनील गवस, आप्पा मांजरेकर, दया मेस्त्री, आदी पदाधिकारी व मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.