सिंधुदुर्गनगरी /-
कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने, मिशन बिगीन अगेन अंतर्गत, राज्य शासनाने दिनांक 23 नोव्हेंबर 2020 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने दिनांक 25 नोव्हेंबर 2020 रोजी पासून गोवा राज्याच्या सीमेवर कार्यवाही सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस अधिक्षक तुषार पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी, उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड, सावंतवाडीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे, वेंगुर्लाचे तहसिदार प्रविण लोकरे, दोडामार्गचे तहसिलदार श्री खानोलकर, पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी, वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक अविनाश भोसले आदींसह सबंधीत अधिकारी उपस्थित होते. पात्रादेवी आणि दोडामार्ग याठिकाणी महसूल, पोलीस आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाची प्रत्येकी तीन पथके तैनात करण्याविषयी सूचना यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या. तसेच सातार्डा, आरोंदा, आयी या ठिकाणी तपासणीसाठी एक पथक थर्मल स्कॅनिंगसाठी तैनात करण्यात यावे. जिल्ह्यात प्रवेश करतेवेळी प्रवाशांना कमीत कमी वेळ थांबावे लागेल असे नियोजन करावे, ज्या लोकांना लक्षणे नाहीत तसेच ज्यांच्याकडे 72 तासापूर्वी कोविड – 19 तपासणी निगेटीव्ह आल्याचे प्रमाणपत्र आहे, त्यांना थेट प्रवेश द्यावा. लक्षणे असलेल्या प्रवाशांची अँटिजेन टेस्ट करावी.ही टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतरच त्यांना प्रवेश द्यावा. जर टेस्ट पॉजिटीव्ह आली तर त्यांना नजिकच्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवावे, कोविड केअर सेंटरमधील सर्व खर्च हा संबंधित प्रवाशांनी करावयाचा आहे. त्या दृष्टीने महसूल व आरोग्य यंत्रणेने समन्वय साधून काम करावे. बांदा येथील प्रवाशांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तर दोडामार्ग येथील प्रवाशांना दोडामार्ग ग्रामिण रुग्णालय येथे तपासणीसाठी पावठावे. रेल्वेने योणाऱ्या प्रवाशांचीही रेल्वे स्थानकावर तपासणी करण्यात यावी, त्यासाठी कुडाळ, सावंतवाडी, कणकवली या स्थानकावर आरोग्य पथके तैनात ठेवावीत. गोवा, गुजरात, राजस्थान आणि दिल्ली या राज्यांमध्ये थांबा असणाऱ्या रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे. विमानाने येणाऱ्या प्रवाशांच्या माहितीसाठी निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी गोवा विमानतळ प्रशासनाशी समन्वय ठेवावा व प्रवाशांची माहिती संबंधित तालुक्यातील तहसिलदार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे द्यावी. नियमितपणे कामा निमित्त व नोकरी निमित्त गोवा येथे जाणारे व येणारे प्रवाशींचे फक्त थर्मल स्कॅनिग करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.