मालवण /
दिवाळी सुट्टी कालावधीत मालवणात ५० हजारपेक्षा जास्त पर्यटक आलेत. ३० नोव्हेंबर पर्यंत हा आकडा १ लाख होण्याची शक्यता आहे. आलेले
पर्यटक मास्क वापरत नाहीत. सोशल डिस्टन्सचे तर तीनतेरा वाजले आहेत. जिल्हा प्रशासन व नगरपरिषद प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. नगराध्यक्ष झोपी गेलेले आहेत. या सर्व परिस्थितीवर वेळीच लक्ष न दिल्यास मालवण शहरात कोरोनाची दुसरी लाट येईल. कोरोनाचा प्रसार सिंधुदुर्ग व्यापून टाकेल अशी भीती माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सिंधुदुर्गात कोरोनाची दुसरी लाट आल्यास जिल्हा प्रशासन व नगरपरिषद यंत्रणा जबाबदार असेल असा इशारा आचरेकर यांनी दिला आहे. तसेच पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्याला वाऱ्यावर सोडले असल्याचे सांगत पालकमंत्र्यांच्या कारभारावर टीका केली.
मालवण शहर भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सुदेश आचरेकर बोलत होते. यावेळी शहर अध्यक्ष दीपक पाटकर, गटनेते गणेश कुशे, जिल्हा चिटणीस विजय केनवडेकर, अशोक तोडणकर, जगदीश गावकर, महेश सारंग, उपस्थित होते.
जिल्हा प्रशासन व नप प्रशासन ठप्प आहे. सरकार निष्क्रिय असून प्रशासन निष्काळजीपणाने वागत आहे. मालवणात पर्यटकांचा ओघ वाढला असून वेळीच लक्ष न दिल्यास कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात रुग्ण वाढले आहेत. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली असल्याचे आचरेकर यांनी सांगितले.
पर्यटकांची रॅपिड टेस्ट गरजेची होती..
मालवणात येणाऱ्या पर्यटकांची रॅपिड टेस्ट गरजेची होती. पालकमंत्री सत्ताधारी लोकप्रतिनिधी व नगराध्यक्ष यांनी प्रशासनाच्या सहकार्याने पुढाकार घेणे गरजेचे होते. मात्र, कोणतीही कार्यवाही झाली नाही. पर्यटक थेट दाखल होतात. मास्कचा वापर करत नाही. सर्व ठिकाणी गर्दी केली जाते याला जबाबदार कोण असा सवाल आचरेकर यांनी उपस्थित केला आहे.
आमदार व नगराध्यक्षांची दुट्टपी भूमिका….
मालवण शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचे धोरण नगराध्यक्षांचे आहे. तर आमदार वैभव नाईक विना मास्क फिरणाऱ्या पर्यटकांवर दंड आकारू नका असे सागत आहेत. एकाच पक्षाच्या दोन लोकप्रतिनिधीची दोन भूमिका असून जनतेचा खेळ मांडला आहे. असे गटनेते गणेश कुशे यांनी सांगितले.
शहरातले प्रश्न गंभीर मात्र, नगराध्यक्षांचे दुर्लक्ष…..
मालवण शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. मॉर्निंग वॉक, नाईट वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांवर कुत्रे धावून येतात. रस्त्यावरून चालणे मुश्किल बनले आहे. गुरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याबाबत नगराध्यक्षणी वेळीच बंदोबस्त न केल्यास आगळे वेगळे आंदोलन छेडण्याचा इशारा सुदेश आचरेकर यांनी दिला. नगरपालिकेची सभा गेले नऊ महिने झाली नाही. दोनवेळा ऑनलाईन सभा झाली. मात्र, त्यात जनतेचे प्रश्न मांडता येत नाही. सर्व खुले झाले असताना १९ सदस्यांच्या सभेस नागराध्यक्षांचा विरोध का असा सवाल आचरेकर यांनी उपस्थित केला. यापुढील सभा ऑफलाईन न झाल्यास सभेवर बहिष्कार घालू असा इशारा गटनेते गणेश कुशे यांनी दिला आहे.
भ्रष्टाचार प्रकरणांची लवकरच पोलखोल……
मालवण नगरपालिकेत नगराध्यक्ष आणि कंपनीने केलेल्या आर्थिक भ्रष्टाचार प्रकरणांची लवकरच पोलखोल केली जाणार आहे. असा इशारा गटनेते गणेश कुशे यांनी पत्रकार परिषदे दरम्यान दिला.