कोल्हापूर /-
निगवे खालसा (ता. करवीर ) येथील जवान संग्राम शिवाजी पाटील (वय ३५) यांना जम्मू येथील राजौरी येथे सेवा बजावत असताना पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आले. शुक्रवारी रात्री दोनच्या दरम्यान ड्युटी संपवून क्वॉटर्सकडे जात असताना ८१ एमएम मोटर सर्च हल्ल्यात ते शाहिद झाले.संग्राम हे २००२ साली १६ मराठा बटालियन मधून भरती झाले होते. बेळगाव येथे प्रशिक्षण घेवून १८ वर्षे त्यांनी देशसेवा बजावली. बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी कमी वयात ते भरती झाले होते. त्यांची १७ वर्ष करार (बॉन्ड) केलेली नोकरी गेल्याच वर्षी संपली होती पण गावी येवून दुसरा काही कामधंदा करण्यापेक्षा देशसेवा करावी म्हणून दोन वर्षासाठी नोकरी वाढवून घेतली होती. ते हवालदार पदावर कार्यरत होते.डिसेंबर महिन्यात १ तारखेला सुट्टीवर येणार असल्याचा फोन संग्राम यांनी घरी व मित्राना गुरुवारी रात्री केला होता. शांत संयमी व मनमिळावू स्वभाव असणाऱ्या संग्राम यांच्या मृत्यूने निगवे गावावर व परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. त्यांची दोन्ही मुले लहान असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.संग्राम यांचे पार्थिव रविवार रात्री किंवा सोमवारी सकाळी निगवे खालसा येथे आणले जाणार आहे. संग्राम यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यासाठी ग्रामपंचायतीजवळ असणऱ्या क्रिंडागणावर चबूतरा उभारण्यात आला आहे . त्यांच्या पश्चात पत्नी हेमलता, मुलगा शौर्य ( ८ वर्ष ), मुलगी शिवश्री ( २ वर्ष ) आई, वडील आणि भाऊ – भावजय असा परिवार आहे.