कुडाळ /-
सिंधुदुर्ग पोलीस पथकाने कुडाळ-झाराप येथील गंगाराम रेडकर यांची चोरीस गेलेली बोलेरो पिकअप मालवाहक गाडी रत्नागिरी जिल्ह्यातील पाली येथून ताब्यात घेतली. १० ते १३ नोव्हेंबर या कालावधीत गंगाराम रेडकर,यांच्या मालकीची बोलेरो पिकअप मालवाहक गाडी (एम एच-०७,पी-२६११) ही अज्ञात चोरट्याने बालाजी मार्बल, कुडाळ येथून चोरुन नेली होती.याबाबत रेडकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात १२ नोव्हेंबर रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, सिंधुदुर्ग अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक, सुनील धनावडे, सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार रामचंद्र शेळके, गुरुनाथ कोयंडे, कृष्णा केसरकर, संकेत खाडये, रवी इंगळे, प्रथमेश गावडे यांचे तपास पथक नियुक्त केले होते. या पथकाने चोरीस गेलेले वाहन व चोरट्याबाबत सखोल चौकशी करुन माहीती घेतली.
दरम्यान एका संशयीत आरोपीजवळ चोरीची बोलेरो पिकअपगाडी असल्याबाबत गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपास पथकाने कोल्हापूर व आजुबाजुचे भागात चोरीस गेलेली बोलेरो पिकअप व चोरट्यांचा शोध तपास सुरू केला.आरोपींचा पूर्व इतिहास तपासला असता चोरट्यावर यापुर्वी वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समजले. दरम्यान चोरीच्या वाहनाचा व चोरट्याचा रत्नागिरी जिल्ह्यातील पाली या गावात सुगावा लागला. पोलीस पथक दाखल झाले. यावेळी एका हायस्कूल समोरील मैदानावर चोरीचे वाहन बेवारस स्थितीत आढळले. मात्र चोरटा पसार झाला होता. ही बोलेरो पिकअप मालवाहक गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. एकंदरीत सदरचा गुन्हा उघडकीस आणणे हे कौशल्याचे व जिकरीचे काम होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पथकाने अथक व अविरत परिश्रम करुन चोरीस गेलेली बोलेरो पिकअप हस्तगत करुन आरोपी निष्पन्न केलेले आहेत. फिर्यादी गंगाराम रेडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे कामगिरी विषयी समाधान व्यक्त करुन तपास पथकाचे कौतुकही केले.त्यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापुर्वी चोरीस गेलेल्या वाहनांचे इतर गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.