मुख्यालयात न राहणाऱ्या शिक्षकांचा अहवाल सादर करा.;पं.स.मासिक सभेत अधिकाऱ्यांना सूचना..

मुख्यालयात न राहणाऱ्या शिक्षकांचा अहवाल सादर करा.;पं.स.मासिक सभेत अधिकाऱ्यांना सूचना..

मालवण /-

कोविडची तपासणी केल्यावर संबंधित शिक्षकांनी मुख्यालयात रहायला हवे. मात्र बरेच शिक्षक हे मुख्यालयात राहत नसल्याचे चित्र असून शाळा सुरू झाल्यानंतर अशा शिक्षकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित करत जे शिक्षक मुख्यालयात राहत नाहीत अशा शिक्षकांचे घरभाडे रद्द करण्यात यावे तसेच याची चौकशी करून तत्काळ अहवाल पंचायत समितीस सादर करावा अशा सूचना पंचायत समितीचे गटनेते सुनील घाडीगावकर यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
मालवण पंचायत समितीची मासिक सभा सभापती अजिंक्य पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, गटनेते सुनील घाडीगावकर, अशोक बागवे, कमलाकर गावडे, विनोद आळवे, सोनाली कोदे, मनीषा वराडकर, मधुरा चोपडेकर, छाया परब, निधी मुणगेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शासनाच्या आदेशानुसार येत्या २३ तारखेपासून शाळा सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षकांना कोविडची तपासणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत ज्या शिक्षकांनी कोविडची तपासणी केली ते शिक्षक मुख्यालयात राहणार का? असा प्रश्न अशोक बागवे, सुनील घाडीगावकर यांनी उपस्थित केला. जर शिक्षक अन्य तालुक्यातील शहराच्या ठिकाणी वास्तव्य करत असतील आणि ते ग्रामीण भागातील शाळेत जात असतील तर यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोविडची तपासणी केलेल्या शिक्षकांनी मुख्यालयात राहायला हवे. मात्र बरेच शिक्षक हे मुख्यालयात राहत नाहीत. मात्र ते शासनाकडून घरभाडे घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जे शिक्षक मुख्यालयात राहत नाहीत अशा शिक्षकांचे घरभाडे रद्द करण्यात यावे अशी मागणी श्री. घाडीगावकर यांनी केली. तालुक्यातील किती शिक्षक मुख्यालयात राहतात याचा तत्काळ अहवाल मागवा अशा सूचना त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. शिक्षकांनी मुख्यालयात राहत असल्याचे सांगितल्यास संबंधित गावच्या सारपंचांकडून तसा दाखला घेण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

अभिप्राय द्या..