कुडाळ /-
पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिवाळी भेट म्हणून कॉनबॅकने बांबूपासून बनविलेला नाविन्यपूर्ण नजराणा देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांच्या सहकार्याने हा योग जुळून आला, अशी माहिती कॉनबॅक संस्थेच्या वतीने देण्यात आली.
कोकण बांबू अॅण्ड केन डेव्हलपमेंट सेंटर (कॉनबॅक) ची राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय बांबू विकासातील कामगिरी सर्वश्रृत आहे. पण आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत त्याला पोचविण्याची एक मनिषा होती. या दिवाळीच निमित्त साधुन ती पूर्ण करण्याचा योग माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या सहकार्याने जुळून आला.
दरवर्षी राज्यसभा सदस्य तथा शेर्पा सुरेश प्रभू हे मोदी यांची दिवाळी निमित्त भेट घेतात. हे औचित्य साधून कॉनबॅक अंतर्गत पारंपारीक बांबू कारागिरांसाठी राबविण्यात येणाऱ्या स्फुर्ती या खादी उद्योग सूक्ष्म, लघु व मद्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकारच्या समुह विकास कार्यक्रमात सहभागी महिलां कारागीरांनी अतिशय सुबक हाताने विणलेला बांबूचा नक्षीदार बॉक्स बनविला.
या बॉक्सच्यावर मोदी यांचे नाव व सदीच्छा संदेश लेझर तंत्रज्ञानाने कोरण्यात आला. विशेष म्हणजे हा बॉक्स रिकामा न देता त्यामध्ये कोकणातील बांबू सारखाच दूर्लक्षीत स्त्रोत म्हणजेच नारळाची करवंटी, ज्यापासून अप्रतिम नक्षीदार असे छोटे बॉक्स तयार करण्यात आले. त्यामध्ये कोकणचा मेवा आंबा रोल, काजू, जांभूळ स्लाईस, कोकनेट क्रंच, मोरआवळा, आलावडी हे पदार्थ आवश्यक अन्न प्रक्रिया मानांकने पाळून सुवक पध्दतीने मांडण्यात आले. असा हा पर्यावरण पुरक बांबू व करवंटीपासून बनविलेला कोकण मेव्याचा स्वाद असलेला नावीन्यपूर्ण नजराणा सुरेश प्रभू यांच्या हस्ते कोकणी माणसाची दिवाळी भेट म्हणून नरेंद्र मोदी यांना सप्रेम भेट देण्यात आला.
अलीकडेच सुरेश प्रभू यांनी बांबू विकासात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना देण्याच्या उद्देशाने इंडिया बांबू फोरमची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून बांबूच्या चळवळीला गती मिळाली आहे. सुरेश प्रभू यांनी कॉनबॅक बांबू चळवळ व राष्ट्रीय स्तरावरील बांबू विकासाची गरज याबाबत या भेटीत मोदी यांच्याशी विशेष चर्चा केल्याचे व त्यास मोदींनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे प्रभु यांनी सांगितले.