नगराध्यक्ष, बांधकाम सभापतींसह पालिका प्रशासनाचे नागरिकांनी मानले आभार..
मालवण /-
गेले काही महिने बंद अवस्थेत असलेले मालवण शहरातील चिवला बीच व भरडनाका येथील हायमॅक्स दिवे अखेर उजळले आहेत. दिवाळीपूर्वी हायमास्क टॉवर प्रकाशमान करण्याचा शब्द बांधकाम सभापती यतीन खोत यांनी दिला होता. त्याची पूर्तता झाल्याने स्थानिक नागरिकांनी यतीन खोत यांच्यासह नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व पालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.
बंद हायमास्ट दिवे दुरुस्तीसाठी पालिकेच्या वतीने गणेशचतुर्थी पूर्वी ठेका देण्यात आला होता. मात्र आज-उद्द्या करत ठेकेदार आलाच नाही. नागरिक तसेच स्थानिक नगरसेविका ममता वराडकर, माजी नगरसेवक महेश जावकर यांच्याकडून हायमास्ट दुरुस्तीबाबत वारंवार मागणी केली जात होती. चिवला बीच परिसरात पारंपरिक मच्छीमारांचा रापण व्यवसाय चालतो. याठिकाणी बंद हायमास्ट मुळे अडचणी येत होत्या. बांधकाम सभापती यतीन खोत यांनी हायमास्ट दुरुस्तीबाबत आग्रही भूमिका घेतली. आधी दिलेला दुरुस्तीचा ठेका रद्द करून तांत्रिक बाबी दूर करत नव्याने दुरुस्तीचा ठेका काढण्यात आला. दिवाळीपूर्वी काहीही करून अंधार दूर झालाच पाहिजे, ही भूमिका खोत यांनी प्रशासनाकडे मांडून कार्यवाही पूर्ण करून घेतली.
हायमास्ट दिवे प्रकाशमान झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत बांधकाम सभापती यतीन खोत, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व पालिका प्रशासनाचे आभार मानले. यावेळी डिक्सन भूतेलो, आदु फर्नांडिस, रुजाय फर्नांडिस, संतोष सावंत, रतन मयेकर, मनोज शिरोडकर, स्वीटन सोज, फ्रान्सिस फर्नांडिस, गणेश चिंदरकर, अल्पेश वराडकर, शिल्पा खोत, शांती तोंडवळकर, दिया पवार यासह मच्छिमार व्यावसायिक व स्कुबा व्यावसायिक उपस्थित होते.