मालवण नगरपालिकेच्या त्या २५ कंत्राटी कामगारांचा पगार न दिल्याने दिवाळी अंधारात.;कामगारात तीव्र नाराजी

मालवण नगरपालिकेच्या त्या २५ कंत्राटी कामगारांचा पगार न दिल्याने दिवाळी अंधारात.;कामगारात तीव्र नाराजी

मालवण /-

मालवण नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील कचऱ्याचा उठाव करणाऱ्या कंत्राटी ६ चालक आणि १९ कामगारांनी थकीत पगाराबाबत काही दिवसांपूर्वी काम बंद आंदोलन केल्यानंतरही आजमितीपर्यंत या कामगारांचा पगार संबंधित ठेकेदारांने न दिल्याने ऐन दिवाळीत या कामगारांची दिवाळी काळोखात गेली आहे याबाबत कंत्राटी कामगारांकडून तीव्र नाराजीयुक्त संताप व्यक्त होत आहे.

मालवण नगरपालिकेने डिसेंबर २०१९ मध्ये स्वच्छता विभागासाठी शहरातील कचरा उठाव करण्यासाठी कामगार तसेच कचरा गाड्यांवर चालक नेमणुकीचे दोन ठेके प्रसिद्ध केले होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन ठेकेदारांनी मालवण नगरपालिकेला कचऱ्याचा उठाव करण्यासाठी कामगार पुरवणे तसेच चालक पुरविणे असे ठेके घेतले. या ठेक्यानूसार कचऱ्याचा उठाव करण्यासाठी एका ठेकेदाराने १९ कामगार तर दुसऱ्या ठेकेदाराने कचरा गाडीवर चालक पुरविण्यासाठी ६ चालक नगरपालिकेला दिले. पूर्वी नियमित पगार देणाऱ्या या दोन्ही ठेकेदारांनी कोरोना महामारीच्या काळात कामगारांचा पगार रखडविला. गणेश चतुर्थी देखील पगाराविना गेल्याने दिवाळी जवळ आली असतानाही पगार न मिळाल्याने अखेर या कामगारांनी आठ दिवसापूर्वी काम बंद आंदोलन केले होते. आंदोलनाच्या वेळी कामगारांच्या बाजूने मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, बांधकाम सभापती यतीन खोत, आरोग्य सभापती पूजा सरकारे, गटनेते गणेश कुशे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. त्यानंतर पंचवीसही कामगार कामावर हजर झाले होते. यावेळी मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी याबाबत १० नोव्हेंबरला दोन्ही ठेकेदार प्रशासन आणि आपण अशी संयुक्त बैठक घेणार असल्याचे सांगत या बैठकीत कचरा उठाव करणाऱ्या कामगार आणि चालकांच्या सुमारे चार लाख रुपये थकीत पगारावर चर्चा होऊन निर्णय होणार आहे, असे सांगितले होते. मात्र ही बैठकच न झाल्याने या कामगारांच्या पगाराचा प्रश्न अधांतरीच राहिला आहे. नगरपालिका प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष वेधुनही आणि आंदोलन करूनही ऐन दिवाळी सणाच्या काळात पगार न मिळाल्याने या कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अभिप्राय द्या..