दोडामार्ग /-
सगळ्यांचे लक्ष लागलेल्या कसई दोडामार्ग नगरपंचायतीचे प्रभाग आरक्षण अखेर आज सोडत पद्धतीने जाहीर झाले आहे. या बदलेल्या आरक्षणाचा अनेक दिग्गजांना मोठा फटका बसला असून यापूर्वी बहुतांश खुला पुरुष जागेसाठी आरक्षित असलेले प्रभाग महिलांसाठी तर महिलांसाठी आरक्षित प्रभाग पुरुषांसाठी आरक्षित झाल्याने पुन्हा बिनधिक्कत नगरपंचायत सत्तेत येऊ पाहणाऱ्या नगरसेवकांना हा धक्का मानला जात आहे.
नगरपंचायतच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आरक्षणाची सोडत आज मंगळवारी महाराजा सभागृहात काढण्यात आली यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून वंदना खरमाळे यांनी काम पाहिले.
या काढण्यात आलेल्या सोडतीने विद्यमान नगरसेवक व पदाधिकारी यांना “कही खुशी कही गम” असाच अनुभव आला आहे. नगरपंचायतच्या सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी 2, 5, 6, 7, 9,11 हे प्रभाग तर सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी 1,12,13,15,16 हे प्रभाग आरक्षित झाले आहेत. इतर मागासवर्गीय पुरुषांसाठी 3, 8 तर मागासवर्गीय स्त्री करीता प्रभाग 4,10, 17 हे आरक्षित झाले आहेत. पूर्वी अनुसूचित जाती पुरुषांसाठी राखीव असलेला प्रभाग आमहिला 14 हा प्रभाग आरक्षित झाला आहे.
यात विद्यमान नगराध्यक्षा लीना कुबल यांचा प्रभाग क्र 9 हा सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांचा प्रभाग 04 हा मागासवर्गीय महिलासाठी आरक्षित तर उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांचा 10 हाही स्त्री मागासवर्गीय म्हणून असून यावेळी या मातब्बर उमेदवारांना निवडणूक लढवण्यासाठी आता दुसऱ्या मतदार संघाचा आधार घ्यावा लागणार असल्याने यावेळची नगरपंचायत निवडून रंगतदार होणार आहे.
यावेळी पक्षीय बळा पेक्षा वैयक्तिक संबंधावर ही निवडणूक लढवावी लागणार असून यातून या नगरपंचयातचे भवितव्य ठरणार आहे, मात्र पक्षीय स्ततरावर ही निवडणूक लढल्यास अनेकांची उमेदवारीची भाऊगर्दी तसेच नाराजी नाट्यही पाहावयास मिळणार असल्याचे या आरक्षण सोडतीतून दिसत आहे.